पार्क

पार्क

आयटी पार्कच्या जागेचा खेळखंडोबा
शेंडापार्क प्रस्तावाबाबत व्यावसायिक अनभिज्ञ; टेंबलाईवाडीतील प्रस्तावाचे काय करणार?

कोल्हापूर, ता. १३ ः शहराच्या विकासासाठी बूस्ट ठरू पाहणाऱ्या आयटी पार्कसाठी तेरा वर्षांत जागेसाठी केवळ खेळखंडोबा सुरू आहे. ठिकठिकाणच्या जागा पाहिल्यानंतर टेंबलाईवाडी येथील जागा निश्‍चितीचे काम अंतिम टप्प्यात आले असे वाटत असतानाच आता शेंडापार्कमधील जागेवर आयटी पार्कसाठी श्री गणेशा करण्याचे ठरवले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्या स्थानिक आयटी व्यावसायिकांसाठी पार्क राबवण्याची मूळ संकल्पना राबवली गेली त्यांना नव्या जागेबाबतची भणकही लागू दिलेली नाही. यातून कोल्हापूरला आयटी पार्क होऊ द्यायचा आहे का? हाच प्रश्‍न उपस्थित होत आहे.

आयटी क्षेत्राचा देशभरात बोलबाला सुरू झालेला असताना आयटी असोसिएशन स्थापन झाले. २००९ पासून या असोसिएशनने शासकीय जागा मिळवण्याचे प्रयत्न केले. त्यावेळी पुढाकार घेतलेले विनय गुप्ते यांच्या मते, ‘‘कोल्हापूर संपन्न असून येथील विविध क्षेत्रांसाठी आयटी व्यावसायिक पूरक काम करत होते. त्यांच्या सक्षमीकरणासाठी पार्क उभा करून रोजगार निर्मिती वाढवण्याचा प्रयत्न होता. २० हजार चौरस फुटांपर्यंतच्या जागेत बांधकाम करून व्यावसायिकांना गरजेप्रमाणे एक, दोन हजार चौरस फुटांपर्यंतची जागा देण्याचे नियोजन होते. त्यासाठी टाकाळा, प्रतिभानगर, पांजरपोळ अशा जागा पाहिल्या. त्याबाबत निर्णय होईपर्यंत महापालिका आयुक्त बदलले. नंतर टेंबलाईवाडी येथील जागेचा प्रस्ताव समोर आला.’’
ती जागा बाहेरील कंपनी बांधून देईल व त्यात व्यावसायिकांनी जागा घ्यायच्‍या असे सूत्र होते. त्या जागेसाठी बरेच प्रयत्न केले गेले. टिंबर मार्केटचे आरक्षण बदलून आयटी पार्कचे आरक्षण टाकले गेले. त्यासाठी सरकारच्या पातळीवर भरपूर पाठपुरावा केला. त्याच दरम्यान आयआरबीने बांधलेल्या इमारतीचाही वापर करण्याचे ठरवले. त्यातून सहा एकरच्या आसपास जागा मिळणार होती. जवळपास आठ वर्षे त्यात गेली आहेत. केपीएमजी कंपनीला सल्लागार म्हणून नेमले होते. त्यांनी प्रस्ताव तयार केल्यानंतर स्थानिक कंपन्यांच्या आवाक्याबाहेरील दर ठेवला. त्यातून मार्ग काढण्यासाठी बराच कालावधी गेला. कोरोना, महापालिका सभागृहाची संपलेली मुदत त्यातूनही विलंब झाला. त्यानंतर वेग द्यायची वेळ आली असतानाच राज्यातील सरकार बदलले.
नव्या सरकारमधून जुन्या आयटी पार्कला चालना मिळेल अशी अपेक्षा असलेल्या व्यावसायिकांना नुकताच पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शेंडापार्कमधील जागा आयटी पार्कला देण्याबाबतचा प्रस्ताव थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवून धक्का दिला आहे. जुन्या प्रकल्पाबाबत काहीही सांगितलेले नाही. नव्या जागेवर झाडांचा मुद्दा आहे. त्यातून मार्ग कसा काढला जाणार, त्यासाठी किती कालावधी लागणार हे अनिश्‍चित आहे. जुन्या जागेवरील प्रकल्पाची धाव निम्म्यापर्यंत आली असताना पुन्हा नव्या जागेवर प्रथमपासून सुरूवात करायची या प्रकाराने हेतूबाबतच शंका निर्माण झाली आहे.

चौकट
स्थानिक व्यावसायिकांसाठी प्राधान्य हवे
२००९ मध्ये असोसिएशन स्थापन केली जात असताना ५० ते ६० व्यावसायिक होते. आता त्यांची संख्या २५० वर पोहचली आहे. ते स्थानिक मार्केटशी कनेक्ट असून, आंतरराष्ट्रीय आयटीशी फार संलग्न नाहीत. त्यामुळे त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोतही मर्यादित आहेत. पार्क उभा करताना स्थानिक व्यावसायिकांच्या उलाढालीचा विचार करून त्यांना प्रथम संधी दिली तर त्यातून व्यवसाय वाढवता येऊ शकतात, असे असोसिएशनचे मत आहे. आता काही प्रक्रिया पूर्ण केल्या तर टेंबलाईवाडीतील जागेवर स्थानिकांसाठीचा पार्क तातडीने साकारला जाऊ शकतो.

कोट
आयटी असोसिएशनला विचारात घेऊन काही प्रस्ताव तयार केले गेले तर ते गतीने साकारता येऊ शकतील; पण शेंडापार्क जागेबाबत तसे काही झालेले नाही. त्याबाबत कुणाला माहिती नाही. टेंबलाईवाडी येथील पार्कबाबतची प्रक्रिया निम्म्यावर आली आहे. तिथे चालना दिली तर पार्क उभा राहू शकेल.
-कैलास मेढे, समन्वयक, आयटी पार्क.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com