डेक्कन ओडीसी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेक्कन ओडीसी
डेक्कन ओडीसी

डेक्कन ओडीसी

sakal_logo
By

फाईल फोटो
.....


पर्यटन हंगाम मध्यावर
डेक्कन ओडीसी जागेवरच

रेल्वेची दुरुस्ती सुरू : मार्ग निश्‍चितीचा तांत्रिक पेच

शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १३ : देशी-विदेशी पर्यटकांना आलिशान व आरामदायी प्रवासातून महाराष्‍ट्र दर्शन घडवणारी डेक्कन ओडीसी शाही रेल्वे यंदाचा पर्यटन हंगाम मध्यावर आला तरी जागेवरच आहे. कोरोनाकाळात बंद पडलेली ही सेवा यंदाच्या जानेवारीला महिन्यात सुरू होणार होती. मात्र, पर्यटन मार्ग निश्‍चितीपासून ते संयोजनापर्यंत अनेक तांत्रिक अडचणींच्या विळख्यात या गाडीचा प्रवास तूर्त थांबला आहे. परिणामी, स्थानिक पातळीवर होणाऱ्या व्यवसायिक उलाढालीला खीळ बसली आहे.
महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळाने २००४ पासून अलिशान रेल्वेतून राज्यातील महत्त्वाची धार्मिक, ऐतिहासिक ठिकाणे, समुद्र किनारे, जंगली भाग, गडकोट-किल्ले सैर घडवणारी शाही रेल्वे सुरू केली. यातून विदेशी पर्यटकांना जास्तीत जास्त आकर्षित करणाऱ्या आलिशान सुविधा दिल्या होत्या. मुंबईतून सुटणाऱ्या डेक्कन ओडीसीच्या माध्यमातून नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद येथील ठिकाणे पर्यटकांना दाखवण्यात येते होती. पाच दिवसांचा हा प्रवास होता. त्यासाठी सुरुवातीला या गाडीला पर्यटकांचा प्रतिसाद होता. मात्र, २००८ ला प्रतिसाद कमी झाला. २०१५ मध्येही रेल्वे तोट्यात चालवण्याची वेळ आली. अवघे ३० ते ६० पर्यटक मिळत होते. अशात बारा डब्यांची रेल्वे पाच दिवस चालवणे अधिक तोट्याचे ठरले. तरीही एमटीडीसीने या गाडीची सेवा सुरू ठेवली. विदेशी पर्यटकांसह काही देशी पर्यटकही या गाडीतून महाराष्‍ट्र दर्शनाचा आनंद घेत होते.
कोरोनाकाळात मात्र डेक्कन ओडीसी मुंबईतील एका रेल्वे स्थानकावर थांबून राहिली. या काळात गाडीतील अंतर्गत आलिशान फर्निचर, कोचिंग तसेच दरवाजे, खिडक्या वातानुकुलित यंत्रणा, खानसामा सुविधा खराब होत गेल्या. त्यानंतरही रेल्वे बोर्डाने ही रेल्वे चालवावी यासाठीही प्रयत्न झाले. यात कोरोनाचे नियम शिथिल झाले. परदेशी व्यक्ती भारतात पर्यटनास येऊ लागल्या. यंदाचा पर्यटन हंगाम नोव्हेंबर महिन्यापासून सुरू झाला, याच काळात डेक्कन ओडीसी गाडीची दुरुस्ती सुरू झाली. त्यानुसार ही रेल्वे नवीन वर्षात सुरू करण्याचे नियोजन एमटीडीसीने केले. मात्र, गाडीचा मार्ग निश्‍चित झालेला नसल्याने डेक्कनचा प्रवास तूर्त थांबलेलाच आहे.
...

स्थानिक पातळीवरही प्रतीक्षा

डेक्कन ओडीसी गाडी कोल्हापुरात आल्यानंतर पर्यटकांना अंबाबाई मंदिर, मर्दानी खेळ, न्यू पॅलेस, रंकाळा तलाव, बाजार पेठ अशी ठिकाणे दाखवण्यात येत होती. यातून येथील व्यापारी उलाढालीलाही बळ मिळत होते. मात्र, गेली चार वर्षे याला खीळ बसली आहे. यंदा मात्र डेक्कन ओडीसी सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तूर्त ती कधी सुरू होईल, हे सांगता येत नसल्याने व्यवसायिकांतही चलबचिल आहे.
....

‘डेक्कन ओडीसी रेल्वे यंदा लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात सुरू आहे. लवकरच नियोजन जाहीर करण्यात येईल.’

दीपक हारणे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी
....

डेक्कन ओडीसीतील सुविधा

बारा डबे, एक पॅन्‍ट्री, इंटरकॉम, म्युझिक सिस्टम, आलिशान आसने, शयनकक्ष, शाही भोजनालय, बार, जिमनॅशियम, कॉन्फरन्स हॉल, आरोग्य सुविधा, अस्लखित इंग्रजी बोलणारे गाईड, शस्त्रधारी सुरक्षा रक्षक आदी सुविधांनी युक्त ही रेल्वे आहे. तब्बल पाच वेळा वर्ल्ड ट्रॅव्हल अॅवॉर्ड जिंकणारी राज्यातील डेक्कन ओडीसी शाही रेल्वे आहे.