
‘गोकुळ मिल्क ई सुविधा’ ॲपचे अनावरण
76066
गोकुळ शिरगाव : येथील गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयात ॲपचे अनावरण करताना आमदार सतेज पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील व संचालक.
‘गोकुळ मिल्क ई सुविधा’ ॲपचे अनावरण
---
आमदार सतेज पाटील; ६,५०० दूध संस्थांच्या कामकाजात येणार सुलभता
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : ‘गोकुळ मिल्क ई-सुविधा या मोबाईल ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यात सहा हजार ५०० दूध संस्थांच्या कामात सुलभता येणार असल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी आज दिली.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाचे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या नवव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून गोकुळ शिरगाव येथील ‘गोकुळ’च्या मुख्य कार्यालयात या ॲपचे अनावरण झाले. या वेळी ते बोलत होते.
आमदार पाटील म्हणाले, ‘‘चुयेकर यांनी सामान्य शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी वेगवेगळ्या योजना आखल्या. पक्ष आणि गटा-तटाच्या पलीकडे जाऊन शेतकरी हा केंद्रबिंदू म्हणून त्यांनी आयुष्य खर्ची घातले. ‘गोकुळ मिल्क ई सुविधा’ या ॲपच्या माध्यमातून प्राथमिक दूध संस्थांना सेवा सुविधा पोचविण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे.’’
‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले, की ‘गोकुळ’ने नेहमीच शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून काम केले. ‘गोकुळ’मार्फत वेगवेगळ्या सुविधांची अंमलबजावणी केली. या विकासाभिमुख योजनांचा भाग म्हणून ‘गोकुळ’मार्फत सुरू असलेल्या सेवा सुविधा प्राथमिक दूध संस्था व दूध उत्पादकांपर्यंत पोचाव्यात, यासाठी हे ॲप मराठीतून तयार केले आहे. याद्वारे संस्थांमार्फत संघास होणाऱ्या दैनंदिन दूधपुरवठ्याची माहिती, प्रत्येक १० दिवसांच्या दूध बिलासंबंधित माहिती, संस्थांची पशुखाद्य मागणी, पशुवैद्यकीय सेवेसाठीची स्पेशल व्हिजिट मागणी, संस्था तक्रार निवारण या सुविधा दिल्या आहेत. या वेळी संचालक अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, आमदार राजेश पाटील, ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, अभिजित तायशेटे, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, युवराज पाटील, संचालिका अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले उपस्थित होते.