शांतादेवी शिष्यवृत्ती वितरण

शांतादेवी शिष्यवृत्ती वितरण

फोटो - 76343, KOP23L76346


आईमुळेच आयुष्याला आकार

डॉ. संजय डी. पाटीलः शांतादेवी डी. पाटील मेरीट शिष्यवृत्ती योजनेचा प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १७ : ‘आम्हा भावंडांच्या आयुष्याला आकार देण्याचे महत्त्वपूर्ण काम आई शांतादेवी डी. पाटील यांनी केले. त्यांची शिक्षणावर श्रद्धा असल्याने आम्हाला चांगले शिक्षण मिळावे, असा त्यांनी अट्टहास धरला. त्यामुळे आम्ही मोठ्या पदांवर पोहचलो. त्यांच्या जन्मदिनी ‘शांतादेवी डी. पाटील मेरीट शिष्यवृत्ती’ योजना सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे’, असे प्रतिपादन डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी आज येथे केले. सामाजिक जाणीवेतून डी. वाय. पाटील ग्रुप काम करत आल्याचेही त्यांनी सांगितले.
डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे ‘सौ. शांतादेवी डी. पाटील मेरीट शिष्यवृत्ती’ योजनेचा आज येथे प्रारंभ झाला. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी शांतादेवी पाटील यांच्या जीवन प्रवासावरील चित्रफीत दाखविण्यात आली. केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला. गुणवंत ६६ विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे वितरण झाले. हॉटेल सयाजी येथे कार्यक्रम झाला.
डॉ. पाटील म्हणाले, ‘डी. वाय. दादा, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील व मी आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत देत आलो आहोत. आता गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी शांतादेवी पाटील मेरिट शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. आईंच्या जन्मदिनी ही योजना सुरू होत आहे.’
आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘आमच्या जडणघडणीत आईचा सिंहाचा वाटा आहे. तिने आमच्या आयुष्याला शिस्त लावली. आमच्या पद, प्रतिष्ठेमागे तिचे कष्ट असून, ती नेहमीच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. ती खचत नाही की, हुरळून जात नाही. तिच्याबद्दल आदरयुक्त भीती तर आहेच, शिवाय तिचे जमिनीशी नाते तुटलेले नाही.’
पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र- कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील म्हणाल्या, ‘आम्हाला चांगले शिक्षण मिळावे, असा आईचा ध्यास होता. जीवनातील कष्टाच्या प्रवासात ती आमच्यावर संस्कार करायला विसरली नाही. ती सातवी शिकली असून, तिच्यात उत्साह व चैतन्य पुरेपूर सामावले आहे. समाधान म्हणजे काय असते, हे तिच्या सहवासात राहून अनुभवण्यासारखे आहे.’ आजच्या पिढीत संयम, आत्मविश्‍वास व सातत्य असणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन अँड रिसर्च फाऊंडेशनच्या उपाध्यक्ष सुप्रिया चव्हाण-पाटील, डी. वाय. पाटील ॲकॅडमीच्या शांतिनिकेतनच्या राजश्री काकडे, आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, वैजयंती पाटील, देवराज पाटील, पूजा ऋतुराज पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील, मेघराज काकडे, करण काकडे, चैत्राली काकडे, कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल, कुलगुरू डॉ. के. प्रथापन, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा, सीएचआरओ श्रीलेखा साटम व सचिव पी. डी. उके यावेळी उपस्थित होते.
----------------
चौकट

अन् हुंदका अनावर....

डॉ. भाग्यश्री पाटील आपल्या भाषणात डी. वाय. पाटील, शांतादेवी डी. पाटील, संजय डी. पाटील यांच्या कष्टाच्या आयुष्याबद्दल सांगत होत्या. त्या वेळी संजय डी. पाटील भावनिक झाले. ते खुर्चीवरून उठून थेट पाटील यांच्या दिशेने गेले. दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले. त्यांना हुंदका अनावर झाला आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. यावेळी आमदार सतेज पाटील यांच्यासह सर्व भावंडे भावूक झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com