''देवगड अर्बन''साठी आता मतदान होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''देवगड अर्बन''साठी 
आता मतदान होणार
''देवगड अर्बन''साठी आता मतदान होणार

''देवगड अर्बन''साठी आता मतदान होणार

sakal_logo
By

‘देवगड अर्बन’साठी
आता मतदान होणार
बारा जागांसाठी २२ उमेदवार
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १७ ः येथील दी देवगड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी १३ जागांसाठी दाखल झालेल्या एकूण ३८ अर्जापैकी एकूण १५ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. सर्वसाधारण गटामधून तालुका बाहेरील एकच उमेदवारी अर्ज आल्याने ती जागा बिनविरोध झाली आहे. त्यामुळे आता १२ जागांसाठी एकूण २२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे अखेर मतदान होणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
बँकेची निवडणूक बिनविरोध होणार की मतदान होणार, अशी चर्चा गेले अनेक दिवस सुरू होती. त्याला आज पूर्णविराम मिळाला. भाजप आणि राष्ट्रवादी पुरस्कृत एक पॅनेल, तर शिवसेना आणि काँग्रेस पुरस्कृत दुसरे पॅनेल अशी सर्वसाधारण व्यूहरचना असल्याचे चित्र आहे. बँकेच्या १३ जागांसाठी एकूण ३८ अर्ज आले होते. छाननीत सर्व अर्ज वैध ठरले. बॅंकेसाठी ११ हजार ५२४ मतदार निश्‍चित झाले आहेत. देवगड तालुक्यातील सात व इतर सर्व तालुके मिळून एक असे एकूण आठ संचालक सर्वसाधारणमधून, दोन महिला संचालक तसेच अनुसूचित जाती जमातीमधून एक, इतर मागास प्रवर्गातील एक आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यातून एक असे एकूण १३ संचालक निवडून द्यायचे आहेत. १३ जागांसाठी एकूण ३८ अर्ज दाखल झाले होते. देवगड तालुका वगळून उर्वरित तालुक्यामधून सर्वसाधारणमध्ये एक जागा होती. या जागेवर एकच अर्ज आल्याने अनिल वामन सावंत बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता देवगड तालुक्यातील सात संचालक सर्वसाधारणमधून, दोन महिला संचालक, तसेच अनुसूचित जाती जमातीमधून एक, इतर मागास प्रवर्गातील एक आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यातून एक, असे एकूण १२ संचालक निवडून द्यायचे आहेत. यासाठी २२ उमेदवार रिंगणात आहेत.

नवे कारभारी ३० ला ठरणार
निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी उद्या (ता. १८) जाहीर करण्यात येणार आहे. (ता. २९) ला मतदान असून (ता. ३०) ला मतमोजणी आहे. सहायक निबंधक (सहकारी संस्था) अनिल राहिंज सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत.