चार गावांना काळ्या पाण्याची शिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चार गावांना काळ्या पाण्याची शिक्षा
चार गावांना काळ्या पाण्याची शिक्षा

चार गावांना काळ्या पाण्याची शिक्षा

sakal_logo
By

GAD182.JPG
76417
नांगनूर : संकेश्‍वर साखर कारखान्याच्या मळीमुळे गोटूर बंधाऱ्या‍याजवळ काळेकुट्ट झालेले हिरण्यकेशी नदीतील पाणी. पाण्यावर तेलकट तवंगही आला आहे. (छायाचित्र : संजय धनगर, जरळी)
---------------------------------------------------------
चार गावांना काळ्या पाण्याची शिक्षा
‘हिरण्यकेशी’ला गटारगंगेचे स्वरूप : सीमेवरच्या गावांत ‘कर्नाटकी’ अन्यायाविरुद्ध संताप
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १८ : तालुक्यातील शेवटच्या टोकावरील चार-पाच गावांच्या नागरिकांवर काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्याची वेळ आली आहे. संकेश्‍वर साखर कारखान्यातून मळी व इतर रसायनमिश्रित काळे पाणी थेट हिरण्यकेशी नदीत येत आहे. त्याचे धडधडीत पुरावे देऊनही कारवाईत कर्नाटक शासनाचे दुर्लक्ष आहे. यामुळे महाराष्ट्र हद्दीतील या गावांवर अन्याय करण्याच्या हेतूनेच हा प्रकार सुरू आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
नांगनूर, इदरगुच्ची, अरळगुंडी, कडलगेकरांना थेट तर बॅक वॉटरमुळे हिटणी, खणदाळच्या नागरिकांसह जनावरे व शेती पिकांच्या आरोग्यालाही या दूषित पाण्याचा धोका निर्माण आहे. अलीकडे कारखान्याची मळी व रसायनमिश्रित पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात येत आहे की संबंधित गावकरी काळ्या पाण्याचीच शिक्षा भोगत आहेत. हा प्रश्‍न सुटावा म्हणून अनेक आंदोलने झाली. लोकप्रतिनिधींचे उंबरे झिजवले. काही लोकप्रतिनिधींनी बंधाऱ्‍याला भेट देऊन पाण्याची पाहणी केली. परंतु, ही समस्या जैसे थे आहे. अलीकडे सीमाप्रश्‍नी राज्यातील सत्तारुढ व विरोधी लोकप्रतिनिधी विविध आश्‍वासनांद्वारे मराठी भाषिकांना सहानुभूती देत आहेत, मात्र त्याच सीमाभागात महाष्ट्रातील गावांना काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात कर्नाटक शासनाचाही हातभार असताना तेच लोकप्रतिनिधी या प्रश्‍नावर चकार शब्दही काढायला तयार नाहीत, या इतके दुर्दैव कोणते नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
दूषित पाण्याने नदीपात्र काळेकुट्ट झाले आहे. गटारी बऱ्‍या, पण हिरण्यकेशी नको, अशी स्थिती झाली आहे. बंधाऱ्‍यावर पाच मिनिटेसुद्धा उभारता येत नाही, इतकी पाण्याची दुर्गंधी आहे. शेतकऱ्यांना बांधावर उभे राहूनच पिकांना पाणी द्यावे लागत आहे. पाण्यात उतरायलाही धाडस होत नाही. पाण्यामुळे पायाला खाज सुटत आहे. सहन न करण्यापलीकडची दुर्गंधी आहे. जनावरांना पाणी पाजणेही मुश्कील आहे. संबंधित गावच्या ग्रामपंचायतींनी या दूषित पाण्याला घाबरून पिण्याच्या पाण्याच्या जॅकवेलची जागाच बदलली आहे. सध्या हा प्रश्‍न नागरिकांना छोटा वाटत असला तरी तो भविष्यात जीवघेणा होण्याची भीती आहे. यामुळे महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी याप्रश्‍नी लक्ष घालून संबंधित गावकऱ्‍यांची काळ्या पाण्याच्या शिक्षेतून मुक्तता करण्याची गरज आहे.
------------
* एकजुटीने लढ्याची गरज
या दूषित पाण्याच्या विरोधात केवळ नांगनूरकरांचा एकाकी लढा सुरू असल्याचे चित्र आहे. शाहू मोकाशी यांनी स्वत: हा प्रश्‍न उचलून धरला आहे. गतवर्षी शिवसेनेने त्यांच्या लढ्याला पाठबळ दिले. त्यांच्या घागर मोर्चामुळे कारखाना शिष्टमंडळ नांगनुरात येऊन सहा महिन्यांत ईटीपी प्रकल्प पूर्णत्वाची ग्वाही दिली. परंतु, वर्ष उलटले तरी अद्याप हा प्रकल्प कार्यान्वित नाही. भविष्यात शेतीला क्षारपडीचाही धोका आहे. यामुळे शेतकऱ्‍यांनी आताच जागे व्हावे. नांगनूरसह सर्वच बाधित गावकऱ्‍यांनी या अन्यायाविरोधात एकजुटीने लढा देण्याची गरज आहे.
------------
कारखान्याच्या मळीमुळे हिरण्यकेशी दूषित होत आहे. याप्रश्‍न मुंबईच्या मानवाधिकार आयोगाकडे पुराव्यासह तक्रार केली. कारखान्याला दहा लाखांचा दंडही झाला. संकेश्‍वर पालिकेला सांडपाण्यावर प्रक्रियेची सूचना केली, परंतु कारखाना व पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. पुन्हा यावर्षी मळीमिश्रित पाणी नदीत सोडले. यामुळे दिल्लीतील ग्रीन कोर्टमध्ये अवमान याचिका दाखल केली आहे.
- शाहू मोकाशी, नांगनूर
-----------------------------------------------
गडहिंग्लजमधील चार ते पाच गावांवर अन्याय होत आहे, हे मान्य आहे. नदीवर अवलंबून सर्वच सजीव यामुळे डिस्टर्ब झाले आहेत, परंतु नदी प्रदूषणाला केवळ हिराशुगर कारखान्याची मळीच नव्हे तर संकेश्‍वर शहराचे सांडपाणीही कारणीभूत आहे. कारखान्याचा दहा कोटींचा ईटीपी प्रकल्प अंतिम टप्प्यात असून, जानेवारीअखेर तो कार्यान्वित होईल.
- सोमगोंडा आरबोळे, संचालक, हिराशुगर कारखाना
--------------------------------------------------------
कारखान्याच्या मळीमुळे नदी प्रदूषित होत असल्याने कर्नाटकातील लोकप्रतिनिधी व शासनाकडे हा प्रश्‍न मांडला आहे. महाराष्ट्र व कर्नाटक प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नोटिसाही कारखान्याला दिल्या, मात्र काहीच सुधारणा नाही. हा प्रश्‍न गंभीर बनल्याने पुन्हा संबंधितांकडे पाठपुरावा करून तो कायमस्वरूपी निकालात काढण्याचा प्रयत्न करू.
- राजेश पाटील, आमदार