
पालखी मार्ग अतिक्रमणमुक्त करा
gad187.jpg
76488
गडहिंग्लज : काळभैरी यात्रा नियोजन बैठकीत मार्गदर्शन करताना बाबासाहेब वाघमोडे. शेजारी दिनेश पारगे, श्रद्धा बुधवंत, शरद मगर, रवींद्र शेळके, स्वरूप खारगे. (अमर डोमणे : सकाळ छायाचित्रसेवा)
----------------------------------------------------
पालखी मार्ग अतिक्रमणमुक्त करा
काळभैरी यात्रा नियोजन बैठक : यंदाची यात्रा होणार डिजिटलमुक्त
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १८ : गडहिंग्लज-बड्याचीवाडीचे ग्रामदैवत श्री काळभैरव देवाच्या यात्रेपूर्वीच प्रशासनाने पालखी मार्ग अतिक्रमणमुक्त करावा, अशी सूचना आजच्या यात्रा नियोजन बैठकीत केली. तसेच यावर्षीची काळभैरी यात्रा डिजिटल फलकमुक्त करण्याचा निर्णयही सर्वानुमते घेण्यात आला. प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे अध्यक्षस्थानी होते.
श्री काळभैरव देवाची मुख्य यात्रा ७ फेब्रुवारी, तर ६ फेब्रुवारीला पालखी सोहळा होणार आहे. त्याच्या नियोजनासाठी आज मंदिर समिती, पुजारी, मानकरी, ग्रामपंचायत व विविध शासकीय विभागांची बैठक झाली. तहसीलदार दिनेश पारगे यांनी स्वागत करून बैठकीचा हेतू सांगितला. मारुती राक्षे यांनी पालखी मार्गातील अतिक्रमणांचा मुद्दा उपस्थित केला. त्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याची ग्वाही श्री. वाघमोडे यांनी दिली. अशोक खोत यांनी वाहतुकीला डिजिटल बोर्डाचा होणारा अडथळा दूर करण्याची सूचना केली. त्यावर यात्रेचे दोन्ही दिवस यात्रा मार्ग व मंदिर परिसरात डिजिटल फलकांना परवानगी न देण्याचा निर्णय झाला. अनधिकृत लागलेले फलक पोलिस बंदोबस्तात हटवण्याचेही ठरले.
श्री. वाघमोडे म्हणाले, ‘कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा यात्रेला मोठी गर्दी होण्याचे संकेत आहेत. विविध शासकीय विभागांनी आपापली कर्तव्ये जबाबदारीने पार पाडावीत. पोलिस व आपत्कालीन विभागाने भाविकांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे. पार्किंग, वाहतूक मार्ग, पाणी, आरोग्य, भाविकांची दर्शन रांग, वीजपुरवठा आदी सुविधा देण्यात कुठेही कसूर होऊ नये. विशेषत: बांधकाम विभागांनी रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करून घ्यावी. सर्वच अंमलबजावणी यंत्रणांनी समन्वयातून यात्रा शांततेत व सुरक्षित पार पाडावी.
यावेळी मारुती राक्षे, अशोक खोत, सुधीर पाटील, संजय गुरव यांनी सूचना मांडल्या. गटविकास अधिकारी शरद मगर, पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके, मुख्याधिकारी स्वरूप खारगे, सरपंच बाजीराव खोत, ग्रामसेवक एस. बी. तोरस्कर, महावितरण अभियंता सागर दांगट, आगारप्रमुख संजय चव्हाण यांनी आपापल्या विभागांचा आढावा घेतला. मंडल अधिकारी रजनी चंदनशिवे, तलाठी अजयसिंह किल्लेदार यांनी नियोजन केले. परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी श्रद्धा बुधवंत यांच्यासह मानकरी, हक्कदार, मंदिर समितीचे प्रमुख, शासकीय अधिकारी उपस्थित होते.
* बैठकीतील ठळक मुद्दे
- एसटीसाठी ग्रामपंचायतीने जागेचे सपाटीकरण करणे
- वाहतूक मार्ग, पार्किंगचे नियोजन करणे
- नगरपालिका, ग्रामपंचायतीने पाणी टँकरची सोय करावी
- बाहेरून मोबाईल टॉयलेट मागविणार
- आपत्कालीन वाहने जातील, अशी दुकानांची रचना करावी
- रुग्णवाहिका, औषधे, वैद्यकीय पथक सज्ज ठेवावे
- सर्व जलस्त्रोतांमधील पाण्याची तपासणी करून घ्यावी
- अन्न व औषध निरीक्षकांकडून खाद्य पदार्थांची तपासणी करून घेणे