दुध मालिका ३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुध मालिका ३
दुध मालिका ३

दुध मालिका ३

sakal_logo
By

(लोगो- कालच्या टुडे १ वरून)

शेतकऱ्यांचे मार्केट हवे
शेतकऱ्यांच्याच हाती!

दूध संघच होताहेत मालमाल ः उत्पादकांसाठी पडावे ठोस पाऊल
सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० : दुधाची खरेदी प्रती लिटर ४७-४८ रुपये आणि विक्री ६०-६२ रुपये प्रती लिटर. खरेदी-विक्रीमधील ११ ते १२ रुपयांचा फरक जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत सर्वसामान्य दूध उत्पादक सक्षम होणार नाहीत. दूध संकलन घटत असल्यामुळे राज्यातील दूध संघ आणि दूध कंपन्यांच्या वार्षिक ताळेबंदाला धक्का बसला आहे. त्यावर चिंतन केले जात असले तरी शेतकऱ्यांचे मार्केट शेतकऱ्यांच्या हातामध्ये राहिल्याशिवाय दुग्ध व्यवसायला चालना मिळणार नाही.

पहाटे उठून जनावरांना वैरण आणणाऱ्या, शेणा-घाणीत हात घालणाऱ्या दूध उत्पादकांमुळेच दूध संस्थांची आणि संघाची भरारी झाली आहे; मात्र दुधाचे राजकारण करणारे त्यावर मोठे होत आहेत. गावा-गावांत कौलारू खोल्यांमध्ये संकलन करणाऱ्या दूध संस्थांनी मोठमोठ्या इमारती बांधल्या. हे चित्र नक्कीच चांगले आहे; मात्र पिढ्यान पिढ्या दुग्ध व्यवसाय करणाऱ्या उत्पादकाला त्याच्या जनावरांच्या गोठ्यात पडलेला खड्डा भरण्याएवढीही आर्थिक सुबत्ता आलेली नाही. शेतकऱ्यांकडून सरासरी ४७-४८ रुपये लिटरने खरेदी केलेले दूध ६०-६२ रुपयांना विक्री होते. लिटरमागे हा जो फरक आहे या फरकातील जास्तीत जास्त रक्कम शेतकऱ्यांना मिळतच नाही. त्यामध्ये प्रक्रिया खर्च आणि वाहतूक खर्च जरी गृहीत धरला तरीही सर्वांत जास्त फायदा संघ किंवा कंपन्यांकडेच राहतो. शेतकऱ्यांना मात्र खाऊन-पिऊन सुखी याच उक्तीप्रमाणे आयुष्य जगावं लागत आहे. उत्पादन आणि उत्पादन खर्चाचा ताळमेळ घातला तर शेतकऱ्यांच्या पदरी गाय-म्हैशींच्या शेणाशिवाय दुसरा काहीही फायदा राहत नाही. जनावरांना चांगला आणि सकस चारा घालावा लागतो. चांगल्या आणि उच्च दर्जाचे पशुखाद्य द्यावे लागते. दिवसभर त्यासाठी राबावे लागते. जनावरांचे पालन पोषण करावे लागते. दहा दिवसांनंतर मिळणारी रक्कम ही राबणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी खच्चीकरण करणारीच असते. सध्या जिल्ह्याला किंवा राज्यालाच नव्हे, तर जगाला दूध टंचाईची समस्या भेडसावत आहे. भविष्यात त्याचा गांभीर्याने विचार करायला हवा, अशी परिस्थिती आहे.
(समाप्त)
...
खर्च-मिळकतीचा लागेना मेळ
जनावरांचा चारा, पशुखाद्य, औषध, स्वच्छता व त्यामागे असणारे मनुष्यबळ याचा विचार करता प्रती लिटर दुधामागे सुमारे ३० ते ३२ रुपये खर्च होतात. दूध काढल्यानंतर दूध संस्थेत देताना फॅट व एसएनएफच्या चाचणीनंतर प्रती लिटर दुधाला सरासरी ४७ ते ४८ रुपये दर मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या राबणुकीएवढे दामही मिळत नाही.
--
कोट
तरुणांनी दुग्ध व्यवसायात यायला हवे. नवीन तंत्रज्ञानही अवगत करायलाच हवे. ज्या पद्धतीने ग्राहकांना दुधाची विक्री केली जाते त्यानुसार शेतकऱ्यांच्या वाट्याला दर मिळतो का? याचा विचार केल्यास निश्‍चितच तरुण दूध उत्पादक हा व्यवसाय आनंदाने स्वीकारतील.

-भिकाजी सातपुते, तरुण दूध उत्पादक.