''म्हादई'' विरोधात विर्डीवासीयांचा ''एल्गार'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''म्हादई'' विरोधात विर्डीवासीयांचा ''एल्गार''
''म्हादई'' विरोधात विर्डीवासीयांचा ''एल्गार''

''म्हादई'' विरोधात विर्डीवासीयांचा ''एल्गार''

sakal_logo
By

77114 आणि 77115
विर्डी ः येथे शनिवारी झालेल्या बैठकीत सिंधुदुर्गवासीयांना विर्डी गाव वाचविण्यासाठी भावनिक हाक देताना विर्डी उपसरपंच एकनाथ गवस. दुसऱ्या छायाचित्रात संघर्षाचा निर्धार करण्यासाठी उपस्थित विर्डीवासीय.

‘म्हादई’विरोधात विर्डीचा ‘एल्गार’
‘वाळवंटी’ आटण्याची भीती; कर्नाटकाच्या भूमिकेविरुद्ध गाव एकवटला

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २१ ः म्हादईचे पाणी वळविण्याच्या कर्नाटकच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील विर्डी गावातील वाळवंटी नदीचा प्रवाहही आटणार आहे. याविरोधात आता गोव्यापाठोपाठ विर्डी गावानेही आज ‘एल्गार’ पुकारला आहे.
कर्नाटक गोव्याच्या दिशेने येणाऱ्या म्हादई नदीचे पाणी वळविण्याचा प्रकार करत आहे. त्याने फक्त गोव्याला त्रास होणार नसून त्याची सुरुवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यामधील विर्डीपासून होणार आहे. तेथील वाळवंटी नदीचा प्रवाह बंद होणार असून गावावर जलसंकट ओढवणार आहे. त्यामुळे विर्डीचा आवाज बनण्यासाठी दोडामार्ग तालुक्यासह सिंधुदुर्गवासीयांनी साथ द्यावी, असे भावनिक आवाहन उपसरपंच एकनाथ गवस यांनी केले आहे. शिवाय आमची जन्मभूमी विर्डी असली तरी कर्मभूमी गोवा आहे. गोवा सरकारलाही पाठिंबा देताना कर्नाटकचे नदीचा प्रवाह अडविण्याचे धोरण हाणून पाडण्यासाठी एकमुखी संघर्षाचा निर्धार विर्डीवासीयांनी केला आहे. गोव्यानंतर सिंधुदुर्गवासीयांच्याही रोषाला कर्नाटक सरकारला सामोरे जावे लागणार आहे.
सध्या कर्नाटक सरकारच्या म्हादई नदीचा प्रवाह बदलण्याच्या निर्णयाविरोधात गोव्यात संघर्षाचे वातावरण सुरू आहे. गोव्यात प्रवेश करणारी नदी कर्नाटकातून महाराष्ट्रातील विर्डी येथून प्रवेश करते. त्यामुळे गोव्याला या नदी प्रवाहाचा फटका बसत असला, तरी सुरुवात विर्डीतून होणार आहे. याबाबत जनजागृतीची पहिली बैठक आज येथील मंदिरात पार पडली. उपसरपंच एकनाथ गवस, कॅप्टन नितीन धोंड, पर्यावरणप्रेमी निर्मल कुलकर्णी, उद्योजक विक्रम जैन, जॅक सुखजा, श्री. सूरज, व्हॅन्सी फर्नांडिस, देवस्थान समिती अध्यक्ष भगवान घाडी, वनश्री फाउंडेशनचे संजय सावंत, अमित सुतार, देवेंद्र शेटकर, ग्रामपंचायत सदस्य निकिता बोकारकर, उर्मिला गवस, दीक्षा बांदेकर, पद्मजा गवस व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे आयोजन विर्डी क्रिकेट प्रीमियर लीगचे अध्यक्ष उमेश साटेलकर यांनी तर सूत्रसंचालन आकाश गावस यांनी केले.
कर्नाटक सरकार गोव्याच्या दिशेने येणारा पाणी प्रवाह रोखत आहे. याचा दुष्पपरिणाम विर्डीवर होणार आहे. येथील वज्रसखल नदीपासून ते वाळवंटी नदीचा प्रवास संपुष्टात येण्याची भीती आहे. वज्रसखल धबधबा बंद होऊ शकतो. फेब्रुवारीपर्यंत नदीला असणारे प्रवाह लवकर आटणार आहे. त्यामुळे गावात पाण्याची पातळी घटणार आहे. पाळीव जनावरे ते वन्य प्राण्यांनाही पाणवठेही शिल्लक राहणार नाहीत. बागायतींनाही धोका आहे. हे लक्षात घेऊन गोवा सरकारला पाठिंबा देण्यासाठी आणि विर्डी गाव वाचविण्यासाठी आवाज उठवला जाईल. सुरुवातीला गावातून सह्यांची मोहीम राबविली जाईल. हा फक्त विर्डी गावपुरता प्रश्न सीमित नाही, तर पश्चिम घाटातील अनेक गावांना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे विर्डी गावाचा आवाज शासन दरबारी पोहोचविण्यासाठी दोडामार्गवासीयांसह सिंधुदुर्गवासीयांनी साथ द्यावी, असे आवाहन उपसरपंच एकनाथ गवस व उपस्थितांनी केले.
कॅप्टन धोंड म्हणाले, ‘गेली २० वर्षे कर्नाटकचे गोव्याकडे येणारे पाणी वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुरुवातीला केवळ दोन धरणे बांधणार अशी भूल कर्नाटकने दिली. प्रत्यक्षात १७ धरणे बांधण्याचा इरादा कर्नाटकचा आहे. तसे झाल्यास जलस्रोत कर्नाटकच्या खाली येणे मुश्कील आहे. आलमट्टीसारखे जवळपास १२३ टीएमसी क्षमता असणारे धरण कर्नाटककडे असताना हा अट्टाहास का?’
ते म्हणाले, ‘विर्डीतील नदीला वाळवंटी नाव आहे; मात्र खरेखुरे वाळवंट होण्यापासून नदीला वाचवायचे असेल, तर कर्नाटकविरोधात आजच संघर्ष उभा केला पाहिजे. म्हादईचे पाणी अडविले जाईल, त्यावेळी सगळ्यात पहिला फटका विर्डीसह तळेखोल व अन्य गावांच्या जलस्रोतांना बसेल. कोणत्या पक्षाचे सरकार आहे, या राजकीय विचारांपेक्षा शास्त्रीय विचार करून संपूर्ण दोडामार्ग तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याने विर्डीवासीयांच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे; अन्यथा विर्डीला येणारे पाणी कर्नाटक सरकार हुबळी-धारवाडला नेऊन येथील नदीचे वाळवंट करणार आहे.’
देवस्थान कमिटीचे अध्यक्ष भगवान घाडी म्हणाले, ‘कर्नाटकच्या या धोरणाविरोधात येथील गाव आणि ग्रामपंचायत उभी राहील आणि एकमुखाने संघर्षाचा निर्धार आम्ही करत आहोत.’ संजय सावंत म्हणाले, ‘कर्नाटक सरकार ज्या पद्धतीने रणनीती करत आहे, ते पाहता येथील जलस्रोत संपुष्टात येणार आहेत. त्यामुळे लोकसंघर्ष उभा राहून जागरुक नागरिकांनी पुढे येणे गरजेचे आहे.’ पर्यावरणप्रेमी निर्मल कुलकर्णी म्हणाले, ‘कर्नाटक सरकार केवळ गोव्याला धोक्यात आणत नाही, तर पश्‍चिम घाटालाही याचा मोठा फटका बसणार आहे. कित्येक किलोमीटर वळविण्यात येणारे पाणी हे नैसर्गिक तत्त्वांच्या मुळाशी घाला घालणारे आहे.’
--------
सिंधुदुर्गवासीयांना हाक
कर्नाटक सरकारची अरेरावी बंद करण्यासाठी फक्त विर्डी गाव एकत्र येऊन काही होणार नाही. विर्डी गाव वाचविण्यासाठी सिंधुदुर्गातील तमाम पर्यावरणप्रेमी, सर्वपक्षीय, नेते पदाधिकारी, गावागावांतील सरपंचांनी पुढाकार घ्यावा, असे भावनिक आवाहन येथील ग्रामस्थांनी केले आहे.