
काँग्रेस हाथ से हाथ जोडो
78063
...
आमदार फोडणाऱ्या भाजपची सत्ता फार काळ नाही
आमदार सतेज पाटील : ‘हाथ से हाथे जोडो’ अभियानाची घोषणा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ : देशातील विविध राज्यांमधील आमदार फोडून सत्ता स्थापन करणाऱ्याची भाजपची नीती फार काळ टिकणार नाही. तसेच, मोदी सरकारचे अपयश घराघरांत पोचविण्यासाठी गुरुवारी (ता. २६) प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान राबवले जात आहे. यासाठी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने अंतर्गत गट-तट विसरून काँग्रेसचा विचार घरोघरी पोचवला पाहिजे’, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी आज केले. काँग्रेस कमिटीच्या जिल्हा कार्यालयात ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाची घोषणा करण्यात आली.
आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ अभियानानंतर देशात मोठा बदल होत आहे. भाजपचा सत्ताखेळ जास्त दिवस चालणार नाही. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्याने, ज्यांना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच इतर सहकारी संस्थांमधून चांगल्या पदावर काम करता आले अशा कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक घर आणि घर पिंजून काढले पाहिजे. काँग्रेसचा विचार घराघरांत पोचवला पाहिजे. महागाईच्या झळा प्रत्येक कुटुंबाला बसत आहेत. त्याचीही जाणीव करून दिली पाहिजे.
आमदार पी. एन. पाटील म्हणाले, ‘‘भाजपने सर्वसामान्य आणि गरीब लोकांचे जगणे मुश्कील केले आहे. ही माहिती सर्वच माध्यमातून घराघरांत पोचली पाहिजे. काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.’’
ॲड. अभय छाजेड म्हणाले, ‘‘लोकांना बदनाम करायचे. विनाकारण त्यांची चौकशी करायची हेच काम भाजपकडून केले जात आहे. राहुल गांधी याचे भारत जोडो अभियाने इलेक्ट्रॉनिक मीडियावर दाखवले नाही.’’
या वेळी बाळासाहेब देशमुख, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे, आमदार जयंत आसगावकर उपस्थित होते.
.....
‘त्या’ केंद्रीय मंत्री कुठे गायब झाल्या?
‘प्रजेच्या अंगावर कपडे नाहीत म्हणून महात्मा गांधी केवळ धोतर घालून आयुष्य जगले. तर, दुसरीकडे गरिबांचा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी ११ लाखांचा सूट घालून फिरतात. हा खूप मोठा विरोधाभास आहे. ४०० रुपयांचा गॅस ४५० रुपयाला झाला म्हणून गॅस सिलिंडर रस्त्यावर घेऊन बसणाऱ्या केंद्रीय मंत्री गॅसच्या किंमती ११५० रुपये झाल्यावर कुठे गायब झाल्या, अशी टीका आमदार पी.एन.पाटील यांनी केली.