
पाणीपुरवठा
पंप दुरुस्ती पूर्ण, आजपासून दररोज पाणी
---
ए, बी, ई वॉर्डसह संलग्न भागातील टंचाई होणार दूर
कोल्हापूर, ता. २४ ः शिंगणापूर अशुद्ध पाणी उपसा केंद्राकडील पंपाची दुरुस्ती झाली असल्याने उद्या (ता. २५)पासून ए, बी व ई वॉर्डसह संलग्न उपनगरांना रोज पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे १४ जानेवारीपासून सुरू झालेल्या दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन बंद केले.
उपसा केंद्रातील एक पंप नादुरुस्त झाल्याने जुन्या शिंगणापूर योजनेवर अवलंबून असणाऱ्या भागांना पंप दुरुस्त होईपर्यंत योग्य दाबाने पाणीपुरवठा होणार नव्हता. त्यामुळे १४ तारखेपासून ए, बी, ई वॉर्डसह संलग्न भागात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. त्याचवेळी पंपदुरुस्तीचे कामही युद्धपातळीवर हाती घेण्यात आले होते. पाणी उपसा पूर्ण क्षमतेने होत नसल्याने अनेक भागात पाणी टंचाई जाणवली. काही भागात तर सलग दोन दिवस पाणी आले नसल्याने नागरिकांचा संताप वाढत होता. काही ठिकाणी आंदोलनेही झाली. भाजपच्या शिष्टमंडळाने तर पाणीपुरवठा विभागाचा पिच्छा पुरविला. पाणीपुरवठा विभागाने आजपर्यंत पंपदुरुस्ती करून उपसा केंद्रातून पाणी उपसा सुरू करण्यात आला. त्यामुळे उद्यापासून तिन्ही वॉर्डमध्ये रोज पाणीपुरवठा होणार आहे.