शेंडा पार्क जमिन नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेंडा पार्क जमिन नाही
शेंडा पार्क जमिन नाही

शेंडा पार्क जमिन नाही

sakal_logo
By

शेंडापार्कची जमीन देण्यास नकार

कृषी, आरोग्य विभागः जैव विविधता, वृक्ष संपदा जपण्याची आवश्यकता

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २४ : जैव विविधता, ३४ हजारांवर वृक्ष संपदा आणि शहराला नैसर्गिक शुद्ध हवा देणाऱ्या शेंडापार्क येथील जमीन प्रशासकीय कार्यालयांसाठी देण्यास कृषी व आरोग्य विभागाने नकार दिल्याचे समजते. त्यामुळे प्रस्तावित जिल्हाधिकारी कार्यालय, करवीर पोलिस ठाणे, तहसीलदार कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, हवामान प्रयोग शाळेसह इतर कार्यालयांसाठी आणि जिल्हा क्रीडा संकुलासाठी जागेचा नव्याने शोध घ्यावा लागणार असल्याचे चित्र आहे.
शेंडा पार्कची जागा कृषी विभाग आणि आरोग्य विभागाच्या ताब्यात आहे. या जागेतील सुमारे ३४ हजार झाडे शहराच्या वैभवात भर घालत आहेत. शहराला चांगली आणि स्वच्छ हवा देणारे ठिकाण म्हणूनही याकडे पाहिले जाते. ही जागा प्रशासकीय कार्यालयांसाठी दिली तर या ठिकाणी असणारी वृक्षसंपदा आणि जैव विविधता अडचणीत येणार आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच ही जागा मोकळी असावी, यासाठी कृषी आणि आरोग्य विभागाने ही जागा देण्यास नकार दिला असल्याची माहिती आहे.
शेंडा पार्क येथील १३४ हेक्टरपैकी ८३.५५ हेक्टर जमिनीची मागणी केली आहे. यामध्ये आयटी पार्क, उच्च न्यायालयाचे खंडपीठ, जिल्हा क्रीडा संकुल, जिल्हा ग्रंथालय, मेट्रॉलॉजी लॅब, पब्लिक हेल्थ लॅब, जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर काही शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी आणली जाणार आहेत. जिल्हा प्रशासनाचा हा हेतू जरी चांगला असला तरी या जागेवरील वृक्षसंपदा कायम राहिली पाहिजे, या हेतूनेच कृषी व आरोग्य विभागाकडून या प्रस्तावाला नकार देत फेरविचार करण्याबाबत मागणी केल्याची माहिती आहे. याच जमीनीवर नैसर्गिक शेती, आंबा, काजू, लिंबूसह इतर औषधी वनस्पती आहेत. जनावरांसाठी लागणारा चांगला आणि सकस चाराही उपलब्ध आहे.
....

विद्यापीठानंतर सर्वाधिक
वृक्ष असणारी जागा

शिवाजी विद्यापीठानंतर कोल्हापूर शहरातील सर्वात जास्त वृक्ष असणारी जागा म्हणून शेंडा पार्ककडे पाहिले जाते. याच ठिकाणी विविध पक्षी, प्राण्यांची वास्तव्य आहे. या प्राण्यांना धोका पोहचू नये, असाही एक सूर उमटू लागला आहे. अशी सर्व कारणे देत प्रशासकीय इमारतींबाबत फेरविचार करण्याबाबत चर्चा केली असल्याचेही समजते.
......