विद्यापीठ, महाविद्यालयांतील ४० हजार कर्मचाऱ्यांचा परीक्षा कामकाजावर बहिष्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठ, महाविद्यालयांतील ४० हजार कर्मचाऱ्यांचा परीक्षा कामकाजावर बहिष्कार
विद्यापीठ, महाविद्यालयांतील ४० हजार कर्मचाऱ्यांचा परीक्षा कामकाजावर बहिष्कार

विद्यापीठ, महाविद्यालयांतील ४० हजार कर्मचाऱ्यांचा परीक्षा कामकाजावर बहिष्कार

sakal_logo
By

परीक्षा कामकाजावर टाकणार बहिष्कार

विद्यापीठ, महाविद्यालयांतील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी २ फेब्रुवारीपासून आंदोलन

संतोष मिठारी ः सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २५ ः सुधारित आश्‍वासित प्रगती योजना, सातवा वेतन आयोग, रिक्त पदांची भरती, अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी गेल्या चार वर्षांपासून शासनाकडे राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र, निव्वळ आश्‍वासनाशिवाय या समितीच्या पदरात काहीच पडलेले नाही. त्यामुळे मागण्यांच्या पूर्ततेबाबत आता टप्प्याटप्याने तीव्र लढा देण्याचा निर्धार समितीने केला आहे. त्यातील पहिला टप्पा म्हणून २ फेब्रुवारीपासून राज्यातील विविध विद्यापीठ, महाविद्यालयांतील सुमारे ४० हजार कर्मचारी परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकणार आहेत.
सन २०११ पासून पदभरती निर्बंधांमुळे आणि सततच्या सेवानिवृत्तीमुळे राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालयांत कर्मचाऱ्यांची ११,२०० इतकी पदे रिक्त आहेत. त्यामुळे सध्याच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. विद्यापीठ कर्मचाऱ्यांना ५८ महिन्यांची सातव्या वेतन आयोगानुसार वाढीव वेतनाच्या फरकाची आणि महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना मंजूर केलेली वाढीव वेतनाची थकबाकी अद्याप दिलेली नाही. शासनाने सुधारित सेवांतर्गत आश्‍वासित प्रगती योजनेचे लाभ पूर्वलक्षी प्रभावाने काढून घेऊन सातव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीनुसार वेतन निश्‍चितीचे आदेश दिले आहेत. या सर्व बाबींमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून त्यांनी आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे.

याबाबत राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीचे प्रमुख संघटक अजय देशमुख म्हणाले, ‘संयुक्त समितीने डिसेंबर २०२१ मध्ये सलग ११ दिवस राज्यस्तरीय कामबंद आंदोलन केले होते. त्यावेळी तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाहीचे आश्‍वासन दिल्याने समितीने आंदोलन स्थगित केले. त्यावर समितीने पाठपुरावा सुरू ठेवला; पण केवळ चर्चा, आश्‍वासनांशिवाय आम्हाला काहीच मिळाले नाही. त्यामुळे २ फेब्रुवारीपासून परीक्षा कामकाजावरील बहिष्काराने तीव्र आंदोलन सुरू केले जाईल. पुढे निदर्शने, काळ्या फिती लावून काम, लाक्षणिक संप आणि कामबंद आंदोलनाने त्याची तीव्रता वाढविण्यात येईल.
...

फेब्रुवारीतील परीक्षा अशा ...

बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १ ते २० फेब्रुवारी, तर लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून आणि दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा १० फेब्रुवारीपासून होईल. विद्यापीठ आणि महाविद्यालयीन पातळीवरील पदवी प्रथम वर्षाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा २ फेब्रुवारीपासून होणार आहेत.
...

सेवक संयुक्त कृती समितीच्या मागण्या

सुधारित सेवांतर्गत आश्‍वासित प्रगती योजना पूर्ववत लागू करावी.
सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार १०.२०.३० वर्षांनंतरच्या लाभाची योजना लागू करावी.
२००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
रिक्त पदे भरण्यास मान्यता द्यावी. सातव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करावी.