हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक रांगोळी यात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक रांगोळी यात्रा
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक रांगोळी यात्रा

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक रांगोळी यात्रा

sakal_logo
By

ich251, 2.jpg
78132
१) श्री ब्रह्मनाथ
78133
२) गैबीसाहेब

श्री ब्रह्मनाथ यात्रा व गैबीसाहेब उरूस रांगोळी विशेष....८ कॉलम रंगीत पट्टी

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक रांगोळी यात्रा

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे खास महत्त्व प्राप्त झालेले गाव. अलीकडे वस्त्रनगरी इचलकरंजी व पलीकडे चंदेरीनगरी हुपरीमध्ये पंचगंगेच्या तीरावर वसलेले गाव म्हणजे रांगोळी. अंगणात शुभकार्यास कलेतून साकारलेली व शोभा आणणारी रांगोळी त्याप्रमाणे रांगोळी गाव. गावात अनेक वर्षांपासून परंपरा जोपासलेली गावाची यात्रा व उरूस तिथी व काळाप्रमाणे न येता कायमस्वरूपी २६ व २७ जानेवारीला प्रजासत्ताक दिन व ब्रह्मनाथ यात्रा, गैबीसाहेब उरूस होतो. त्यानिमित्त......
----------
गावात १९५० पूर्वी यात्रा भरवली जात नव्हती. आजूबाजूच्या गावात यात्रा/ उरूस भरवले जात होते, याचे शल्य ग्रामस्थांना होते. १९५१ मध्ये सरपंच कै. रघुनाथराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली यात्रा भरवण्याचा संकल्प केला गेला. २६ जानेवारी १९५२ या भारतीय प्रजासत्ताक दिनादिवशी कै. धर्मगोंडा पाटील व कै. रघुनाथराव देसाई यांनी ब्रह्मनाथ देवाची पहिली यात्रा भरवली. यात्रेचे नियोजन करण्यासाठी कै. दत्ताजी बंडू सादळे, कै. बंडू आल्लाप्पा देसाई या तरुणांकडे यात्रेची जबाबदारी दिली. या वेळी ख्रिश्र्चन चर्च ते अठरा मैल मार्गे रेंदाळ येथे पहिल्या शर्यती घेण्यात आल्या. सायंकाळी झेंडा चौक येथे प्रसिद्ध शाहीर पिराजी सरलष्कर यांचा पोवाड्याचा कार्यक्रम सादर केला. ब्रह्मनाथ देवाचा नैवैद्य पूजेचा मान हा आण्णासाहेब नांगरे पाटील (आप्पा) यांच्याकडे होता. ती परंपरा आजअखेर त्यांचे वंशज दादासो पाटील यांनी अविरत चालू ठेवली आहे. यानंतर २७ जानेवारी १९६० मध्ये दातेकमत येथे असणाऱ्या गैबीसाहेब पिराचा उरूस (कै.) करीमसाहेब मुल्लाणी यांनी भरवण्यास सुरुवात केली. पहाटे कमते, मोरे, भुयेकर या मानकरी लोकांच्या हस्ते मानाचा गलेफ घातला जातो. ही प्रथा आजपर्यंत अव्याहतपणे सुरू आहे. जसेजसे दिवस जाऊ लागले, तसतसा गावाचा कायापालट होत गेला. यात्रा, कार्यक्रमांचे स्वरूप बदलत गेले. मोहोंजोदडो, हडप्पा, हेमाडपंथी यासारख्या ऐतिहासिक वारसांच्या खुणा सांगणाऱ्या गावाच्या इतिहासातील ही ७२ वी यात्रा सर्व जातीधर्माचे लोक आजसुद्धा गुण्यागोविंदाने, आनंदाने व एकोप्याने साजरी करीत आहेत. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन ही यात्रा यशस्वी करण्यासाठी मनापासून प्रयत्न करतात. या प्रजासत्ताक दिनाला कोणत्याही प्रकारचे गालबोट रांगोळीकरांकडून लागले जाणार नाही, याची पुरेपूर दक्षता रांगोळीकर नागरिक व पाहुणेमंडळी घेत असतात.
प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारीला एखादे लोकप्रिय कलापथक साजरी करण्याची पद्धत रूढ झाली आहे. त्यानंतर २७ जानेवारीला आलेल्या पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी जलसा किंवा तमाशा कलावंतांमार्फत कला सादर करण्याची पद्धत रूढ झाली. ही प्रथा आजतागायत कायम सुरू आहे. २६ जानेवारीला बैलगाडी तसेच सायकल शर्यती भरवल्या जात असत. तसेच २७ जानेवारीला घोडा गाडी शर्यती, बैलांच्या लाकूड होण्याच्या शर्यती होत असत. या स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील आसपासच्या गावातून लोक येत असतात. मात्र महाराष्ट्र शासनामार्फत चार-पाच वर्षांमध्ये मुक्या प्राण्यांच्या शर्यतीवर बंदी घातल्यामुळे या स्पर्धा रद्द केलेल्या आहेत. याच यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात मनोरंजनाचे कार्यक्रम आजही मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. दहा वर्षांत यापूर्वी रांगोळीमध्ये असणारी नाट्यप्रेमाची आवड काहीअंशी कमी झालेली दिसून येते. दहा वर्षांपूर्वीच्या काळात २६ जानेवारीपूर्वी सलग चार दिवस अगोदर म्हणजे २२ ते २५ जानेवारी दरम्यान रांगोळीमध्ये स्वखर्चाने नाटके सादर केली जात होती. यामध्ये कवडीचुंबक, अश्रूंची झाली फुले, वारणेचा वाघ, अपराध मीच केला ही काही गाजलेली नाटके. सध्या नाटकाचा खर्च परवडत नसल्यामुळे ही नाट्यपरंपरा बंद झाली. ही नाट्यपरंपरा जोपासणाऱ्या मंडळींमध्ये राम सावेकर, आर. डी. सादळ, प्रेमचंद पाटील, जयकुमार पाटील, एम. आर. पाटील, बी. जे. पाटील, घोडके बंधू, वसंत कुंभार यासारखी मुरब्बी माणसे होती. घोडके बंधूंनी तर आपला एक वेगळा ठसा उमटलेला होता. त्यांनी अनेक नाटके सादर करून रांगोळीकरांचे मनोरंजन करण्याचा एक चांगला प्रयत्न केलेला होता.
प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ जानेवारीला भरवल्या जाणाऱ्या भव्य कुस्ती स्पर्धा हे या प्रजासत्ताक दिनाचे आणखीन एक वैशिष्ट्य. या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नावाजलेले मल्ल रांगोळीच्या गाजलेल्या मैदानात येतात व आपले कौशल्य पणाला लावतात. या कुस्त्या प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या असतात. यामुळे आजही रांगोळीकर युवकांना आपली शरीरयष्टी चांगली राखण्यासाठी व मन सुदृढ राखण्याच्या दृष्टीने हे कुस्ती मैदान ही एक पर्वणी असते. कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी लांबून कुस्ती शौकीन येत असतात. आज या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी इचलकरंजीचे पैलवान अमृत भोसले मामा, मोहन सादळे, चंद्रकांत देसाई, तानाजी सादळ अंकल, दादासो पाटील तानाजी सादळे, ग्रामपंचायत पदाधिकारी, रांगोळी विकास सेवा संस्था पदाधिकारी, महालक्ष्मी पतसंस्था, उदय पतसंस्था पदाधिकारी, रांगोळीतील सर्व युवा तरुण मंडळे, येथील मंडळातील युवा कार्यकर्ते हे रात्रंदिवस झटत असतात. त्यामुळे रांगोळीमध्ये अशाप्रकारे आगळे वेगळे चैतन्याचे वातावरण या निमित्ताने आठ दिवसात असते.

शब्दांकन- प्रेमचंद पाटील, रांगोळी
---------------------------
*रांगोळीचे आजअखेर झालेले सरपंच*
कै. धर्मगोंडा बाळगोंडा पाटील १९५२ ते १९५६
कै. रघुनाथराव यशवंतराव देसाई १९५६ ते १९८०
कै. आण्णासो बाळा मोरे १९८० ते १९८४
कै. करीमसो अली मुल्लाणी १९८४ ते १९८९
कै. सुरेंद्र सखाराम शिरोळकर १९८९ ते १९९२
कै. प्रकाश मारुती मोरे १९९२ ते १९९७
श्रीकांत जिनाप्पा कांबळे १९९७ ते २००१
कै. जालिंदर बाबू कुरणे २००१ ते २००२
अनिल सुरेंद्र शिरोळकर २००२ ते २००५
रावसो महादेव सादळे २००५ ते २००७
संगीता सुभाष नरदे २००७ ते २०१०
राजश्री रावसाहेब माने २०१० ते २०१२
आसमा बापूसो मुल्लाणी २०१२ ते २०१७
नारायण दत्ताजी भोसले २०१७ ते २०२२
संगीता सुभाष नरदे २०२२ ते २०२७
------------
यात्रेनिमित्त भरगच्च कार्यक्रम
२६ जानेवारी सकाळी दहा वाजता ब्रम्हनाथ देवाची पालखी मिरवणूक निघणार आहे. पालखीचा मार्ग बिरदेव मंदिरपासून ते ब्रम्हनाथ मंदिरपर्यंत आहे. यानंतर रात्री ठीक नऊ वाजता कोल्हापूरकरांचा ऑर्केस्ट्रा धमाका हा कार्यक्रम होणार आहे. तसेच २७ जानेवारीला पहाटे मानाचा सरकारी गलेफ गैबीसाहेब येथे घालण्यात येणार आहे. यानंतर सायंकाळी चार वाजता भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान होणार आहे. यामध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती माऊली जमदाडे (कोल्हापूर) विरुद्ध गणेश जगताप (पुणे) यांच्यामध्ये होणार आहे. या कुस्त्यामध्ये लहान मोठ्या ९४ कुस्त्या होणार आहेत. यानंतर रात्री ठीक नऊ वाजता जगन कराडकर, सारिका कराडकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे. २८ जानेवारीला सायंकाळी नऊ वाजता चैत्राली यांचा ‘नाद करायचा नाही’ हा लावणीचा कार्यक्रम होणार आहे. हे सर्व कार्यक्रम प्रजासत्ताक सोहळा समिती ग्रामपंचायत तसेच गावातील विविध तरुण मंडळे, संस्था, महिला बचत गटातर्फे राबवण्यात येणार आहेत.

(पुरवणी संकलन : संतोष कमते, रांगोळी)