
आजरा ः आजरा महाविद्यालय बातमी
79243
आजरा ः येथील कार्यक्रमात बोलताना राजा शिरगुप्पे. शेजारी अन्य मान्यवर.
स्त्री-पुरुष समतेतून समाजाची प्रगती ः शिरगुप्पे
आजरा, ता. ३० ः महिलांनी विविध क्षेत्रांत झेप घेतली आहे. पुरुषांनी महिलांचा आदर करावा. त्यांच्यातील क्षमता ओळखून संधी द्यावी. दोघांनी सुसंवादातून समाजासाठी काम केले तर समाजाची प्रगती होण्यास वेळ लागणार नाही, असे ज्येष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पे यांनी सांगितले.
येथील आजरा महाविद्यालयात समान संधी व लैंगिकता या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. महाविद्यालयाच्या समान संधी विभागाने याचे आयोजन केले होते. मराठी विभागप्रमुख डॉ. आनंद बल्लाळ अध्यक्षस्थानी होते.
शिरगुप्पे म्हणाले, ‘स्त्रीकडे जनन क्षमता ही एक वेगळी निसर्गाने बहाल केलेली क्षमता वगळता सर्व स्त्री-पुरुष एक आहेत. पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रीवर घरातील विविध कामे सोपवली आहेत. ही कामे वेळखाऊपणाची असली तरी कौशल्यपूर्ण आहेत. या कामांना दुय्यम दर्जा दिला आहे; पण जेव्हा ही कामे अर्थार्जनासाठी उपलब्ध होतील त्यावेळी ती पुरुषांची असतील. अलीकडे महिलांनी वंश सातत्याचा गुण टिकवूनही सर्वच क्षेत्रांत उंच भरारी घेतली आहे.’
डॉ. बल्लाळ म्हणाले, ‘हजारो वर्षांपासून दबलेली स्त्री प्रगत व्हायची असेल तर सामाजिक प्रथांची जळमटं त्यांनी आपल्या मनातून झटकली पाहिजेत. त्यावेळी समाजाची स्त्री आणि पुरुष ही चाकेही समान वेगाने धावतील.’ प्रा. लता शेटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. रागिणी राजमाने यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. स्वाती माने यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. मीना मंगरुळकर यांनी आभार मानले.