
विद्यापीठ परीक्षेत कॉपी करणारे १८ जण सापडले
कॉपी करणारे १८ जण सापडले
विद्यापीठ परीक्षेत भरारी पथकाची कारवाई
कोल्हापूर, ता. ३० ः शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षेत कॉपी (गैरप्रकार) करणारे १८ परीक्षार्थी भरारी पथकाला सोमवारी सापडले. त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हिवाळी सत्रातील (ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२२) पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. त्यात सोमवारी बी. एम., बीएस्सी., बी. टेक., बी. फार्मा., बी. एस्सी (कॉम्प्युटर सायन्स), अशा विविध २७ अभ्यासक्रमांच्या परीक्षा वर्णनात्मक (ऑफलाईन) पद्धतीने झाल्या. या परीक्षेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर नियंत्रण, नजर ठेवण्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने भरारी पथके स्थापन केली आहेत. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र पथक आहे. या पथकांना तिन्ही जिल्ह्यांतून १८ परीक्षार्थी कॉपी करताना सापडले. त्यांची नोंद या पथकाने विद्यापीठाकडे केली असून, या परीक्षार्थींवर परीक्षा प्रमाद समितीतर्फे नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली.