
श्री श्री रविशंकर कणेरी मठ भेट
79587
सुमंगलम महोत्सव ज्ञान, विज्ञान, अध्यात्माचा संगम
---
श्री श्री रविशंकर; कणेरी मठावर भेट देऊन तयारीची केली पाहणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ ः कणेरी मठावर होणारा सुमंगलम महापंचभूत महोत्सव ज्ञान, विज्ञान आणि आध्यात्माचा अनोखा मिलाफ असून, त्यातून साऱ्या जगाला दिशा मिळणार आहे. त्यासाठी काडसिद्धेश्वर स्वामीजी व त्यांच्या अनुयायांनी घेतलेले कष्ट कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी काढले. सिद्धगिरी मठ येथे त्यांनी आज भेट देऊन महोत्सवाच्या तयारीची पाहणी केली आणि उपस्थितांशी संवाद साधला.
कणेरी मठ येथे २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत सुमंगलम महापंचभूत महोत्सव होईल. त्याची जोरदार तयारी सध्या मठावर सुरू आहे. याबाबतची माहिती श्री श्री रविशंकर यांना मिळाल्यावर त्यांनी आज महोत्सवस्थळी भेट देऊन तयारीची पाहणी केली. काडसिद्धेश्वर स्वामी यांनी त्यांना महोत्सवाविषयीची माहिती दिली. जगभरातून किती लोक येणार, त्यांची व्यवस्था आणि एकूणच महोत्सवाच्या वैशिष्ट्यांची सविस्तर माहिती त्यांनी दिली. मठावरील विविध ठिकाणी श्री श्री रविशंकर यांनी भेटी देऊन तेथे साकारत असलेल्या प्रकल्पांचीही माहिती घेतली.
भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवितानाच पर्यावरणाविषयीचे प्रबोधनही या महोत्सवातून होईल. त्यासाठी समाजातील सर्वच घटकांना बरोबर घेऊन हे काम सुरू आहे. त्याचा विशेष आनंद असल्याचेही श्री श्री रविशंकर यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी त्यांना या वेळी महोत्सव काळात मठावर भेट देण्याचे निमंत्रणही दिले. अरविंद देशपांडे, राघवेंद्र कागवाड, कृष्णानंद, उद्योजक सुरेंद्र जैन या वेळी उपस्थित होते. डॉ. संदीप पाटील यांनी स्वागत केले.
चौकट
दोन आध्यात्मिक गुरूंची प्रेरणादायी भेट
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वपरिचित असलेल्या दोन आध्यात्मिक गुरूंची झालेली ही भेट आणि त्यांनी केलेले एकमेकांचे स्वागत सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरले. या वेळी विश्वशांतीसाठी शंखनाद आणि सामूहिक ओंकार जपही झाला. त्यामुळे या भेटीची उंची आणखी वाढली.