वाचक पत्रे

वाचक पत्रे

मत-मतांतरे
---------

शेंडा पार्कमधील वनराई जपा
शेंडा पार्क परिसरात प्रशासकीय कार्यालयांसाठी इमारती बांधण्यास परवानगी देण्यात आली आहे. येथून शहर जोडणारे रस्ते सतत गजबजलेले असतात. शेंडापार्कच्या पूर्व-पश्चिम भागात कृषी विद्यालयाची प्रक्षेत्रे कार्यालये, महाविद्यालये व त्याला संलग्न इमारती, कुष्ठरुग्णांचे स्वाधारनगर, चेतना विकास मंदिरही येतात. पूर्व भागात एका कोपऱ्यात दुग्ध संशोधन केंद्र, कृषी विद्यालयाचे कार्यालय व महावितरण कंपनीचे उपकेंद्र आहे. उरलेल्या क्षेत्रावर २०१८ मध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. यात शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांनी, अनेक संस्था-संघटनांनी योगदान दिले आहे. त्याचे फळ म्हणून उघड्याबोडक्या माळावर हिरवाई डोलू लागली. येत्या काही वर्षांत तेथे समृद्ध वनराई उभी राहणार आहे. एक-दोन वेळा वणवा लागूनही त्यातून होरपळलेल्या झाडांना नागरिकांनी, संघटनांनी एकत्र येऊन जिद्दीने नवसंजीवनी दिली. येथे शासकीय इमारती उभ्या राहत असताना या वनराईला धक्का लागू नये, एवढीच अपेक्षा आहे. बैठकीत याबाबत नक्कीच साधक-बाधक चर्चा झाली असेल, अशी आशा आहे.
श्रीराम वडुस्तेकर, कोल्हापूर

खेडी कधी स्मार्ट बनणार?
भारत हा खेड्यांचा देश आहे. महात्‍मा गांधींनी ‘खेड्याकडे चला’ असा संदेश दिला; पण खेड्यांकडेच दुर्लक्ष होताना दिसते. शहरे स्मार्ट होतानाचा भास होतो आहे; पण खेड्यांचं काय? शुद्ध पाणी, शाळेच्या इमारती, शिक्षक, आरोग्य सेवा, रस्ते, खड्डे, धूळ, उघडी गटारे, साथीचे आजार, वाहतूक, नद्यांमधून मिसळणारे सांडपाणी असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. शेती हा मुख्य व्यवसाय; पण दिवसा १२ तासांची विजेची मागणी मान्य होत नसल्याने बळीराजा नाराज. धान्याला हमीभाव नाही, भाजीपाल्याला कवडीमोल भाव. यावर ठोस उपाय व्हायला हवेत. खेड्यात जाऊन अडचणी दूर केल्याशिवाय खेडी स्मार्ट होणार नाहीत.
रावसाहेब शिरोळे, रुकडी (जि. कोल्हापूर)

संवाद व्यवस्थेचा दर्जा सुधारा
उलट-सुलट भावना भडकावणारी विधाने आपण अवतीभवती पाहत आहोत. बेताल वक्तव्याचा प्रश्न देशभर जाणवत आहे. सर्वत्र राजकारणात राजकीय शत्रूत्व वाढीस लागताना दिसते. भारतासारख्या देशात द्वेषयुक्त वक्तव्ये चालणार नाहीत. त्यामुळे सार्वजनिक वातावरण बिघडणार, हे सत्य आहे. यावर उपाय काय? कायदे करणे. कायदा करून तक्रार होईल. कारवाई मात्र कासवाच्या गतीने होणार. उच्चार स्वातंत्र्याचे महत्त्व जाणून घ्यावे. कायद्याबरोबर इतर पातळीवरही प्रयत्न व्हायला हवेत. त्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणे व प्रबोधन करणे आवश्‍यक आहे.
माधुरी कुंभीरकर, गडहिंग्लज (जि. कोल्हापूर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com