कथक नृत्य गुरूवंदना

कथक नृत्य गुरूवंदना

80263
....
कथ्थक नृत्याविष्कारातून गुरूंना वंदन

प्राची फडणीस यांच्या शिष्यांची ‘उमंग २०२३’ नृत्य मैफल

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर , ता. ३ ः क्षणोक्षणी बदलणाऱ्या अर्थपूर्ण भावमुद्रा, हस्तमुद्रांची अलगद अवखळ हितगुज, सुरेल तितकाच तालबद्ध पदन्यास अशा विविध गुणवैशिष्‍ठ्यांनी नटलेल्या, सजलेल्या कथ्थक नृत्याविष्कारातून नृत्यशिष्यांनी गुरूंना वंदन केले. अन् केशवराव भोसले नाट्यगृह टाळ्यांच्या गजराने घुमून निघाले. निमित्त होते, कथ्थक नृत्याचे शास्त्रीय शिक्षण घेणाऱ्या शिष्यांची ‘उमंग २०२३’ गुरूवंदना नृत्य मैफल.

येथील प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगणा प्राची फडणीस यांच्या ‘रियाज कथ्थक नृत्य स्कूल’च्या विद्यार्थ्यां‍ची नृत्य मैफल येथे रंगली. तबला वादक राजप्रसाद धर्माधिकारी, माजी खासदार निवेदिता माने, मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते या नृत्य मैफलीचा प्रारंभ झाला.
कथ्थक हा अभिजात भारतीय नृत्यप्रकार असून नृत्य, गायन, अभिनयाव्दारे ही कला जिवंत केली जाते. रास या लोककलेतून कथ्थक प्रगत होत गेले. पुराण व नाट्यशास्त्रातून कथ्थकचा उल्लेख १२ व्या शतकापासून आढळतो, अशी पार्श्वभूमी विशद करीत प्राची यांनी नृत्याला सुरुवात केली.
देवी ध्रुपदाने नृत्य मैफल सुरू झाली. नृत्यांगणा प्राची यांच्यासह शिष्या सिद्धी सरनाईक, रोहिणी कारंडे, राजलक्ष्मी पाटील, वर्षा खाडीलकर वंदन करीत मंचावर अवतरल्या. त्यांनी तालबद्ध ठेक्यासोबत पदन्यास सुरू केला. प्रत्येक टप्प्यात उत्कृष्ट भावमुद्रांद्वारे करुणा, श्रद्धा, भक्तीचा संगम साधत नृत्याविष्कार सादर केला. दुसऱ्या टप्प्यात शिखर ताल सतरा मात्रांमध्ये सादर केला. नृत्य संचालन मनीषा साठे यांनी केले.
या पाठोपाठ कथ्थक व रिबीन नृत्याचे ‘फ्युजन’ शाळकरी मुलींनी सादर करीत वाहवा मिळवली. या नृत्यातील सामूहिक समन्वय सुस्पष्टपणे दिसून आला. भाव व गायन याव्दारे छोट्या-छोट्या रचनांचे सादरीकरण युगंधरा मोहिते, जान्हवी कदम, धून मेहता, बन्सरी हावळ, साधना देशिंगकर आदींनी केले. ही नृत्य मैफल प्राची यांनी आपल्या सासू गीतांजली फडणीस यांना समर्पित केली.
...

संगीत सेवा द्विगुणीत होईल

‘प्राची यांनी पाच शिष्यांना घेऊन सुरू केलेल्या नृत्यशाळेत आता ७५ विद्यार्थ्यांनी नृत्य शिकत आहेत. प्राची या गुरू -शिष्य परंपरा प्रामाणिकपणे पुढे नेत आहेत. त्यांच्याकडे नृत्य शिकलेल्या विद्यार्थीनींचे नृत्य सादरीकरण, संगीत सेवा अशीच द्विगुणीत होत राहील, असा विश्वास राजप्रसाद धर्माधिकारी यांनी यावेळी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com