
जिल्हातील निवडणुकांसाठी पी. एन. - अरुण नरके एकत्र
03154
पी. एन. पाटील (मध्यभागी)
अरुण नरके (डावीकडे)
०००००००००००००००
जिल्ह्यातील निवडणुकांसाठी
पी. एन. - अरुण नरके एकत्र
कुंभी कारखान्यासह सर्व ठिकाणी एकदिलाने लढणार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्यासह जिल्ह्यातील सर्व निवडणुकांमध्ये आमदार पी. एन. पाटील आणि गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके एकत्रित लढण्याचा निर्णय आज घेण्यात आला. येथील श्रीपतरावदादा बोंद्रे सहकारी बँकेत सायंकाळी यासंदर्भात बैठक झाली. त्यामुळे कुंभी कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्याविरोधी असणाऱ्या शाहू आघाडीला बळ मिळणार असल्याचे चित्र आहे. मात्र, कारखान्याच्या सभासदांचा निर्णय अंतिम ठरणार आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी. एन. पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके एकत्र पाहायला मिळत होते; पण गेल्या काही वर्षांमध्ये पाटील व नरके यांच्यामध्ये विविध निवडणुकांमध्ये अंतर असल्याचे पाहायला मिळाले. विधानसभा, लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोघेही नेते आपापल्या पातळीवर लढताना दिसले. कुंभी कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काही दिवसांत अरुण नरके यांची बैठक होणार असल्याची चर्चा परिसरात होती. सध्या कुंभी कारखान्याची अटीतटीची निवडणूक होत आहे. अरुण नरके यांचे पुतणे आमदार चंद्रदीप नरके यांची कुंभी कारखान्यावर एकहाती सत्ता आहे. या निवडणुकीदरम्यान अरुण नरके यांची भूमिका महत्त्वाची ठरते. मतदानाचा कालावधी जवळ आला असताना अरुण नरके यांची भूमिका काय असणार, याकडे करवीर मतदारसंघाचे लक्ष होते.
आज आमदार पी. एन. पाटील, अरुण नरके आणि चेतन नरके यांची सुमारे दीड तास चर्चा झाली. त्यात भविष्यातील सर्व निवडणुकांमध्ये एकत्र येण्याचा निर्णय झाला. तसेच, कुंभी कारखाना, विधानसभा, लोकसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये, आमदार पाटील व नरके गट एकत्र असणार आहेत. जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राहुल पाटील, गोकुळ संचालक चेतन नरके यांच्या पाठीशी दोन्ही नेते ठामपणे उभे राहणार असा सूर बैठकीचा होता. अरुण नरके यांच्या या भूमिकेमुळे कुंभी कारखान्याच्या निवडणुकीत आणखीनच रंगत येणार आहे. यावेळी गोकुळचे संचालक चेतन नरके उपस्थित होते.
कोट..
कुंभी कारखान्यासह जिल्ह्यातील सर्व निवडणुकांमध्ये गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके आणि आम्ही एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकसंघपणे आणि एकदिलाने काम करतील.
- पी. एन. पाटील, आमदार
आमदार पी. एन. पाटील आणि मी खूप जुने मित्र आहोत. भविष्यात जिल्ह्यातील सर्व निवडणुका एकसंघपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भविष्यातील वाटचाल असेल.
- अरुण नरके, गोकुळचे माजी अध्यक्ष