आमचं शहर आमच बजेट

आमचं शहर आमच बजेट

लोगो- आमचं शहर, आमचं बजेट
L80928
दरवर्षी उठून त्याच-त्याच प्रश्‍नांवर वेळ अन् पैसा खर्च कशासाठी?
-
एक समस्या, एकदाच निधी,
कायमस्वरूपी निपटारा...

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः दरवर्षी उठून त्याच-त्याच समस्यांवर वेळ व पैसा खर्च करायचा. त्याऐवजी प्रत्येक वर्षी एक समस्या डोळ्यासमोर ठेवा व त्याच्यावर लक्ष केंद्रित करून तिचा निपटारा करण्याचे धोरण महापालिकेने अवलंबण्याची गरज आहे. त्यातून शहरवासीयांचे प्रश्‍न मार्गी लागून शहर विकासासाठी नवीन कामांना हात घालता येईल, अशा सूचना आज शहरवासीयांनी केल्या.

महापालिकेच्या आगामी अंदाजपत्रकाच्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ने ‘आमचं शहर, आमचं बजेट’ या उपक्रमांतर्गत थेट शहरवासीयांमध्ये जाऊन महापालिकेच्या अंदाजपत्रकाबाबत अपेक्षा जाणून घेण्यास सुरूवात केली. असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट ॲंड इंजिनियर्समध्ये शहराच्या पायाभूत सुविधांबाबत साधलेल्या संवादात शहरवासीयांनी रोखठोक मते व्यक्त केलीच. शिवाय मौलिक सूचनाही केल्या. कर भरणारे बहुसंख्य नागरिक सामान्य वर्गातील असून, त्यांच्या सुविधांना प्राधान्य दिले जात नाही. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून अंदाजपत्रक बनवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. रस्ते असो वा पंचगंगा नदी प्रदूषण असो, हे प्रश्‍न सुटू शकतात. पंचगंगा प्रदूषणाला जबाबदार असलेल्या जयंती नाल्याच्या समस्येवर या वर्षीच्या अंदाजपत्रकात लक्ष केंद्रित करा. तिचा निपटारा होण्यासाठी आवश्‍यक निधीची तरतूद करा. जेणेकरून पुढील वर्षी हा प्रश्‍न राहणार नाही व त्यावर निधीही खर्च करावा लागणार नाही. त्यातून इतर कामांसाठी निधी उपलब्ध होईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास किमान पाच वर्षे त्या रस्त्याकडे पहायची गरज भासणार नाही. या पद्धतीने महापालिकेने पायाभूत सुविधांबाबतच्या धोरणात बदल करायला हवा असेही सांगितले.
अग्निशमन दल सक्षम करण्यासाठी टर्न टेबल लॅडर आणले. पण, त्यासाठी आवश्‍यक पाण्याचा टॅंकर घेतला नसल्याने तो थांबवून ठेवला आहे. कोट्यवधी रुपये एका सुविधेत घालायचे व ती विनावापर ठेवायची हे नियोजन बदलले गेले पाहिजे. महापालिका पाणी उपसा पंप, कार्यालये यासाठी मोठ्या प्रमाणावर वीज खर्च करते. त्यासाठी सोलर पॉवर वापरण्यास सुरूवात केली तर विजेवरील खर्च कमी होऊन तो निधी विकासकामांना वापरता येईल असे सुचवले. पर्यटकांना सुविधा देण्याची चर्चा होते. पण, त्याचे प्रतिबिंब अंदाजपत्रकात वा त्यानंतर वर्षभरात दिसत नाही असा आक्षेपही घेतला. पार्किंग तसेच पादचाऱ्यांची सुरक्षितता यासाठी कडक धोरण अवलंबले पाहिजे. रस्त्यांचे रूंदीकरण काळाची गरज असून, पार्किंगची आधुनिक संकल्पना स्वीकारून जास्तीत जास्त पार्किंगची जागा उपलब्ध झाली तरच आगामी काळात शहर सुसह्य होईल.

अशा सूचना
खर्चात काटकसर केल्यास नवीन कामे होतील
आर्थिक शिस्तीचा विचार केला जावा
पाणी उपसा पंपावरील वीज खर्च कमी करा
हेरिटेज इमारतीच्या परिसरातील अतिक्रमणे हटवा
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करा
हद्दवाढीसाठी शहरात सुविधा द्या
एलईडी बल्बचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहन द्या
अनावश्‍यक ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नको
रस्ते चांगले राहण्यासाठी पावसाच्यादृष्टीने आराखडे बनवा
कचरा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर बायोसॅनिटायझर वापरा
पर्यटकांना फिरण्यासाठीची यंत्रणा उभी करा
शासनाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांची मदत घ्या
जुनी वाहने भंगारात काढावीत
नगररचना विभागातील कामकाजाला गती द्या
फेरीवाल्यांना शिस्त लावण्यासाठी पथक हवे
रस्ते गुणवत्तेसाठी तांत्रिक निगराणी आवश्‍यक
परीख पुलाखालील सांडपाणी निर्गतीला प्राधान्य द्या
वृक्षारोपणासाठी महापालिकेच्या विहिरींतील पाणी वापरा
स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेसाठी किट द्या
स्वच्छ हवा कार्यक्रमात नवीन कामांना सुरूवात करा
केएमसी कॉलेजमध्ये रोड सेफ्टीचा कोर्स सुरू करा
पंतप्रधान आवास योजनेसाठी विशेष मोहीम राबवा
----
*अजय कोराणे (अध्यक्ष, असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट ॲंड इंजिनियर)- बॉंडमधून पैसे उभे केल्यास जबाबदारीने काम होईल
*उज्‍ज्वल नागेशकर(व्यावसायिक)-पर्यटनस्थळे जोडणारे रस्ते करावेत
*ॲड. बाबा इंदुलकर(सामाजिक कार्यकर्ते)-खर्च, कामावर अंकुश ठेवणारा दक्षता विभाग हवा
*रमेश पोवार(निवृत्त अभियंता)-भांडवली खर्चाचे नियोजन व काटकसर हवी
*महेश यादव(माजी अध्यक्ष, क्रीडाई)-वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्ते रुंदीकरण हवे
*विजय चोपदार (उपाध्यक्ष, असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट ॲंड इंजिनियर)-पर्यावरणीय अहवाल बनवावा
*गिरीश आरेकर (वाहतूक अभ्यासक)-अपघाताचे ब्लॅक स्पॉट कमी करावेत
*फिरोज शेख (सामाजिक कार्यकर्ते)-खुल्या जागा नावावर करण्यासाठी वेगळी यंत्रणा नेमा
*राज डोंगळे (सचिव, असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट ॲंड इंजिनियर)-भुयारी सेवावाहिन्यांचा आराखडा तयार करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com