
बुरुडेमध्ये २५ ग्रॅम चरस जप्त तस्कराला अटक; दोन किलो गांजाही
८०९६८
आजरा ः स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करीत एकाकडून गांजा आणि चरस जप्त केला.
आजऱ्याजवळ चरस, गांजा जप्त; एकाला अटक
कोल्हापूर, ता. ६ ः बुरुडे (ता. आजरा) परिसरातून तब्बल दोन किलो गांजा, २५ ग्रॅम चरस व इतर, असा ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रविवारी सायंकाळी जप्त केला. कारवाईत मुख्य संशयित पुंडलिक शंकर कडाकणे (वय ३५, रा. महागाव, ता. गडहिंग्लज) याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले, की पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर नजर आहे. गडहिंग्लजमधील सराईत तस्कर कडाकणे काल सायंकाळी बुरुडे गावाजवळ चरस आणि गांजा विक्रीसाठी येणार होता. त्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अंमलदार महेश गवळी यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडून ४८ हजार रुपये किमतीचा दोन किलो गांजा, साडेबारा हजार रुपये किमतीचे २५ ग्रॅम चरस व इतर मुद्देमाल जप्त केला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक विनायक सपाटे, कॉन्स्टेबल महादेव कुराडे, हरीश पाटील, खंडेराव कोळी, अनिल जाधव, किरण शिंदे आदींच्या पथकाने कारवाई केली. जप्त पदार्थ आणि कडाकणे यांचा ताबा आजरा पोलिसांकडे देण्यात आला.
आजरा-चंदगड परिसर कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमा भागात आहे. याचाच फायदा घेऊन तेथे अमली पदार्थांची विक्री होते. काही वर्षांपूर्वी तेथील रॅकेट थेट मुंबईतून चालले असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे आताच्या कारवाईतूनही पुढे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.
संशयित कडाकणे अमली पदार्थांच्या तस्करीतील सराईत गुन्हेगार आहे. यापूर्वी त्याच्यावर चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तो, तस्करीसाठी अन्य कोणाचा वापर करतो, त्याचे रॅकेट याचा शोध घेणार आहे.
- महादेव वाघमोडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक