गूळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गूळ
गूळ

गूळ

sakal_logo
By

आजपासून गूळ सौद्यांचा पेच

बहुतांश माथाडी कामगार गेले गावी

कोल्हापूर, ता. ६ ः शाहू मार्केट यार्ड येथील गूळ सौद्यांत काम करणाऱ्या माथाडी कामगारांनी मजुरी वाढीची मागणी दीड महिन्यापासून लावून धरली आहे. आज जिल्हा सहकार निबंधक यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत मजुरीवाढीबाबत निर्णय न झाल्याने बहुतांश माथाडी कामगार सायंकाळी सहानंतर गावी निघून गेले. त्यामुळे उद्या, मंगळवारपासून गूळ सौद्यांचा पेच निर्माण होणार आहे.
गूळ बाजारपेठेत काम करणाऱ्या जवळपास दीडशेवर माथाडी कामगारांनी मजुरीवाढीसाठी गेल्या महिन्यात काम बंद आंदोलन केले होते. त्यानंतर शेती उत्पन्न बाजार समिती, जिल्हा सहकार निबंधक, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठका झाल्या होत्या. या बैठकांमध्ये माथाडी कामगारांनी मजुरीवाढ द्यावी, तसेच मजुरीवाढीसंदर्भात नवा करार करावा, अशा दोन मागण्या लावून धरल्या. याचवेळी व्यापाऱ्यांनी राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापुरात गूळ बाजारपेठेत सर्वाधिक मजुरी माथाडी कामगारांना देण्यात येत आहे, त्यामुळे आता नव्याने मजुरीवाढ देणे शक्य नाही, असे स्पष्ट केले होते. तरीही माथाडी कामगार काम बंद आंदोलनावर ठाम राहिले. त्यामुळे शेती उत्पन्न बाजार समितीने यातील काही माथाडी कामगारांना नोटीस बजावली होती.
दरम्यान, माथाडी कामगार गावी निघून गेल्याने उद्या गुळाचे वर्गीकरण करणे, तोलाई करणे, पॅकिंग करणे व गूळ रवे ट्रकमध्ये भरणे ही कामे ठप्प होणार आहेत. त्यामुळे उद्या कदाचित सौदे होतील; पण मालाचा उठाव होणार नाही. शाहूपुरी मर्चंट असोसिएशनच्या सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, माथाडी कामगारांना राज्यात कोल्हापुरात सर्वाधिक मजुरी दिली जाते. असे असताना माथाडी कामगारांनी अचानकपणे कामबंद आंदोलन करणे यातून शेतकरी, व्यापारी व माथाडी कामगार, अशा गुळाशी संबंधित सर्वच घटकांचे नुकसान होत आहे.