
घरफाळा दंड सवलत
अखेर थकीत घरफाळा दंडात सवलत
२८ फेब्रुवारीअखेर ५० टक्के तर मार्चमध्ये ४० टक्के सवलत
कोल्हापूर, ता. ७ : यंदाच्या घरफाळ्यासह थकबाकी एकरकमी भरणा केल्यास थकबाकीच्या दंड व्याजामध्ये महापालिका सवलत देणार आहे.
९ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीअखेर निवासी, अनिवासी मिळकतींसाठी ५० टक्के तर १ ते ३१ मार्चअखेर ४० टक्के सवलत दिली जाणार आहे. यंदाचा कर भरणा न केल्याने थकीत झालेल्या मिळकतधारकांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. जे कर भरणार नाहीत अशांच्या मिळकतीवर एक एप्रिलपासून जप्ती तसेच बोजा नोंद केला जाणार आहे.
सवलतीसाठी कॉंग्रेसबरोबर राष्ट्रवादी, भाजप, ताराराणी आघाडी तसेच संघटनांनी प्रशासकांना निवेदने दिली होती. सवलत जाहीर केलेल्या तारखेपासून अंतिम तारखेपर्यंत मूळ थकबाकी, नोटीस व वॉरंट आदी एकरकमी रोखीने भरल्यास दंड व्याजात सवलत देण्यात येणार आहे. संपूर्ण थकबाकी रक्कम व सूट वजा जाता होणारा दंड व्याज अशी रक्कम रोखीने भरणा आवश्यक आहे. थकबाकीपोटी सील केलेल्या मिळकतधारकांना सूट देण्यात येणार आहे. कोणतेही प्रलंबित असलेले अपील पुनर्निरीक्षणासाठीचे प्रकरण, विविध स्तरावरील न्यायालयात दाखल केलेला दावा किंवा रिट याचिका प्रलंबित असल्यास ते विनाअट मागे घेतले पाहिजे. प्रारंभापूर्वी वा समाप्तीनंतरच्या रकमांना लागू राहणार नाही. योजनेपूर्वी भरणा केलेल्या कोणत्याही रकमेच्या परताव्यासाठी या अंतर्गत दावा करता येणार नाही. याचा लाभ सर्व शासकीय मिळकतींनाही घेता येणार आहे.
ही सवलत योजना भविष्यात राबविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. करदात्यांनी कराचा भरणा करावे, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.
चौकट
मार्चअखेर शनिवारी नागरी सुविधा केंद्र सुरू
नागरिकांच्या सोयीकरिता ३१ मार्चअखेर दर शनिवारी सुटीच्यादिवशी सर्व नागरी सुविधा केंद्रे सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे kolhapurcorporation.gov.in या वेब साईटवर ऑनलाईनही भरता येईल. गुगल पे व फोन पेही वापरता येईल.