
गुळ सौदे सुरू
81379
...
पोलिस बंदोबस्तात गूळ सौदे सुरू
गडहिंग्लज, जयसिंगपूर, मलकापूर येथील कामगार बोलावले
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : मजुरीत वाढ द्यावी तसेच नवीन माथाडी करार करावा, या मागण्यांसाठी काम बंद केलेल्या माथाडींना निलंबित करावे तसेच बाहेरच्या गावातून माथाडी कामगार आणून सौदे सुरू करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या. त्यानुसार शाहू मार्केट यार्डात आज पोलिस बंदोबस्तात गूळ सौदे पूर्ववत सुरू झाले. यात गुळाला २००० ते ४२०० चा सरासरी भाव मिळाला.
शाहू मार्केट यार्डात यंदाचा गूळ हंगाम तेजीत असल्याने मागील तीन दिवसांत २५ हजार गूळ रव्यांची आवक झाली. माथाडींनी काम बंद केल्यामुळे गेली दोन दिवस शेती उत्पन्न बाजार समिती, सहकार निबंधक व जिल्हाधिकारी यांच्याकडून माथाडी कामगारांनी काम सुरू ठेवून मजुरीवाढीवर चर्चा करावी, अशी सूचना केली होती. माथाडींनी सूचना धुडकावून लावत काम बंदच ठेवले. त्यामुळे व्यापारी व शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. याची दखल घेत जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी बाहेरगावचे माथाडी कामगार बोलावून काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज गडहिंग्लज, गांधीनगर, जयसिंगपूर, मलकापूर येथील माथाडी कामगार बोलावण्यात आले. या माथाडींना मार्केट यार्डातील माथाडींकडून विरोध होऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवला होते. तसेच माथाडी नेते, पदाधिकारी यांनी मार्केट यार्डात बेकायदा जमाव करू नये यासाठी १४४ कलमही लागू केले. त्यानुसार आज सकाळी सात वाजल्यापासून गूळ सौद्यांना सुरूवात झाली. आज एका दिवसांत दहा हजार गूळ रव्यांची आवक झाली. दुपारी बारा वाजेपर्यंत नव्याने आलेले व शिल्लक असे ८० हजार गूळ रव्यांचे सौदे झाले.
....
मार्केट यार्डात १४४ कलम लागू
राज्यभरात सर्वाधिक मजुरी कोल्हापुरात दिली जाते. त्यामुळे नव्याने माथाडी कामगारांना मजुरीवाढ देणार नसल्याचे शेतकरी व व्यापाऱ्यांनी यापूर्वी अनेकदा स्पष्ट केले आहे. तरीही माथाडी कामगार ऐकत नाहीत. त्यांनी बाजारपेठेत काम करण्यास नकार दिला. याची दखल घेत शेती उत्पन्न बाजार समितीने जवळपास ४०० माथाडी कामगारांना निलंबन कारवाई करण्याची नोटीस मंगळवारी बजावली आहे. दरम्यान, करवीर तहसीलदारांनी माथाडींचे नेते व पदाधिकारी यांनी मार्केट यार्डात जमाव जमवून शांतताभंग करू नये, शेतकरी-व्यापारी यांच्या जीवितास धोका होईल, असे कोणतेही कृत्य करू नये यासाठी १४४ कलम लागू केल्याची नोटीस बजावली.