पुस्तक प्रकाशन

पुस्तक प्रकाशन

81426
....

शिवछत्रपतींच्या कारभारावरील
विविध पैलूंवर प्रकाश

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज : ‘पंत अमात्य बावडेकर दप्तर’चे प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख नव्याने करून देणाऱ्या अनेक गोष्टींचा उलगडा ‘पंत अमात्य बावडेकर दप्तर’ या पुस्तकातून होईल. हुकूमतपनाह रामचंद्र पंत अमात्य बावडेकर यांनी त्यांची आज्ञापत्रे तसेच अस्सल पत्रव्यवहार जपून ठेवले होते. त्या आधारे त्यांच्या वारसांनी शिवछत्रपतींच्या कारभाराचे विविध पैलू उलगडणारे अस्सल पुराव्याचे शिवचरित्र वाचकांसमोर आणले आहे. त्याचा उपयोग नव्या पिढीला होईल,’ असे प्रतिपादन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे केले.
हुकूमतपनाह रामचंद्र पंत अमात्य बावडेकर यांच्या ३०७ व्या स्मृतिदिनानिमित्त ‘पंत अमात्य बावडेकर दप्तर’ या पुस्तकाचे प्रकाशन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. रामचंद्रपंत अमात्य बावडेकर ट्रस्टतर्फे हा कार्यक्रम झाला.
नील बावडेकर म्हणाले, ‘‘हुकूमतपनाह पंत अमात्य बावडेकर यांनी लिहिलेली पत्रे तसेच शिवकालीन अस्सल दस्त कागदपत्रांच्या आधारे पुस्तक तयार झाले आहे. शिवचरित्राचे अस्सल पैलू पुराव्यानिशी नव्यापिढी समोर यावेत, या उद्देशानेच लेखन केले आहे. वास्तविक १९३८ ला याच विषयावरील ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित झाला होता. त्यानंतर ८५ वर्षांनी दुसरा खंड प्रकाशित होत आहे. पहिला व दुसरा दोन्ही खंड एकत्रित या ग्रंथातून वाचकांसमोर येणार आहेत. त्यामुळे अस्सल पुराव्यानिशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कार्यकर्तृत्वाचा उलगडा नव्या पिढीसमोर होणार आहे.’’
ज्येष्‍ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रकाशक सौरभ देशपांडे यांनी पुस्तक प्रकाशनाचे अनुभव सांगितले. डॉ. अमर अडके यांनी प्रास्ताविक केले. नितू बावडेकर यांनी स्वागत केले.
....

चारित्र्यवान समाज घडण्यासाठी
नियमांचे कठोर पालन

या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने ‘रामचंद्र पंत अमत्य लिखित : आज्ञापत्रे, शिवछत्रपतीची राजनीती’ या विषयावर इतिहास अभ्यासक डॉ. केदार फाळके यांचे व्याख्यान झाले. डॉ. फाळके म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याभोवती बुद्धिवंत व्यक्तींचा गोतावळा जमवला होता. त्या आधारेच त्यांनी स्वराज्याची रणनीती आखली. शेतकऱ्यांपासून महिलांपर्यंत प्रत्येक समाज घटकाचे संरक्षण आणि प्रजेचे रक्षण करण्याला त्यांनी प्राधान्य दिले. महिलांवर अन्याय करणाऱ्यांवर गंभीर स्वरूपाची कारवाई करून चारित्र्यवान समाज घडावा, यासाठी नियमांचे कठोर पालन करण्याची शिकवण शिवाजी महाराजांनी दिली.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com