भन्नाट माणसं...प्रेरक कहाणी भाग  ५

भन्नाट माणसं...प्रेरक कहाणी भाग ५

भन्नाट माणसं...प्रेरक कहाणी ः भाग - ५
-
फोटो- 11992
-

‘वाईल्ड लाईफ’ फोटोग्राफीतील हॅपी लाईफ
वन्यप्राणी व पक्ष्यांच्या संरक्षणासाठी देवेंद्र भोसले कार्यरत

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : ‘मसाई पठाराकडे जाणाऱ्या मार्गावर साळींदर जखमी झाल्याचा रात्री कॉल आला. अज्ञात वाहन त्याच्या अंगावरून गेले होते. साळींदर व त्याचे एक पिल्लू जागीच मेले. दुसरे जिवंत असल्याने त्याची कल्पना वन विभागाला दिली. वनपाल विजय दाते यांच्याकडे त्याला सुपूर्द केले. चार दिवसांनी त्याचा मृत्यू झाल्याचे कळाले. त्याला जगविण्यासाठी केलेले प्रयत्न वाया गेले आणि आम्ही सारेच हेलावून गेलो,’ वन्यप्राणी व पक्ष्यांच्या संरक्षणासाठी झटणारे देवेंद्र भोसले सांगत होते. आजवर वन्यप्राणी व पक्ष्यांची हजारो छायाचित्रे त्यांनी कॅमेऱ्यात बंदिस्त केली आहेत. त्यांना आलेले अनुभव हृदयस्पर्शी तितकेच अंगावर काटा आणणारे आहेत. जीवावर बेतणाऱ्या प्रसंगांची फारशी पर्वा न करता ते मात्र फोटोग्राफीतील आनंदी जीवन उपभोगत आहेत.
मंगळवार पेठेतील भोसले यांच्या डोक्यात दुर्गभ्रमंतीचे वेड. ते न्यू हायस्कूलच्या मराठी शाखेतून दहावी उत्तीर्ण झाले. एस. एम. लोहिया ज्युनिअर कॉलेजमधून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवी मिळवली. शालेय जीवनातच त्यांना गडकोटांच्या भ्रमंतीची आवड लागली. महाविद्यालयीन जीवनात अनेक गडकोटांना भेटी दिल्या. त्यातून वन्यप्राणी व पक्ष्यांच्या निरीक्षणाची सवय लागली. भटकंतीत दिसणारे प्राणी व पक्ष्यांच्या संरक्षणाची काळजी त्यांना वाटू लागली. त्यांच्या संरक्षणासाठी ते सुमारे अठरा-एकोणीस वर्षांपूर्वी पुढे सरसावले.
मानवी वस्तीत येणाऱ्या प्राण्यांना जीवास मुकायला लागू नये, अशी त्यांची तळमळ होती. जखमी प्राणी व पक्ष्यांवर तातडीने उपचार करण्याची जबाबदारी स्वीकारून त्यांनी त्या कामात स्वत:ला गुंतवून घेतले. साप, गवा, बिबट्या मानवी वस्तीत शिरल्यानंतर काय करावे, याच्या प्रबोधनासाठी ते कार्यरत झाले. आजही त्यांचे हे काम अव्याहतपणे सुरू आहे. त्याच्या जोडीला वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची त्यांना लागलेली आवड विशेष आहे. कोल्हापूरच्या जैवविविधतेचे सौंदर्य दाखविणाऱ्या छायाचित्रांचा खजिनाच त्यांच्याकडे आकाराला आलाय. डी. वाय. पाटील टेक्निकल कँपस येथे सिक्युरिटी इनचार्ज आहेत. तत्पूर्वी बाऊन्सर, कन्स्ट्रक्शन साईटवर सुपरवायझर व एस. सी. सी. बोर्डात रोजंदारीवर ते काम करत होते. आजही ते कामातून वेळ काढत पक्षी व प्राण्यांच्या संरक्षणासाठी फोटोग्राफीत स्वत:ला हरवून घेतात. त्यांची वन्यप्राण्यांबद्दलची आस्था पाहून आमदार ऋतुराज पाटील यांनी त्यांना कॅमेरा भेट दिला आहे.
(समाप्त)

चौकट
अन् गवाच अंगावर धावला...
बटकणंगलेत काही दिवसांपूर्वी एका विहिरीत गवा पडला होता. त्याला विहिरीतून काढल्यानंतर तो आमच्या टीमच्या अंगावर धावला. तो दोन्ही डोळ्यांनी आंधळा होता, हे आमच्या लक्षात आले. तो पुन्हा विहिरीत पडला. त्याला बाहेर काढून वन विभागाच्या ताब्यात दिले. त्याला
वाचवता आल्याने आम्हाला विशेष आनंद झाल्याचे भोसले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com