
फुटबॉल
81862
‘पीटीएम’ची शिवाजी तरुण मंडळावर मात
फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाचा ऋणमुक्तेश्वर तालीमवर विजय
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : प्रथमेश हेरेकरने नोंदवलेल्या एकमेव गोलच्या जोरावर पाटाकडील तालीम मंडळाने (अ) शिवाजी तरुण मंडळावर १-० ने आज मात केली. शिवाजी संघाच्या खेळाडूंना मिळालेल्या सोप्या संधींचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळास ४ विरुद्ध १ गोलफरकाने पराभूत केले. शाहू छत्रपती केएसए चषक वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे.
पूर्वार्धात शिवाजी तरुण मंडळाच्या विक्रम शिंदेने फ्री किकवर मारलेला फटका पाटाकडीलचा गोलरक्षक महंमद खानने अडवला. त्यानंतर करण चव्हाण-बंदरेने पाटाकडीलची बचावफळी भेदत चेंडू मोठ्या डीतून गोलजाळीच्या दिशेने मारला. तो चपळाईने महंमदने बाहेर काढला. पाटाकडीलच्या ओमकार मोरे, रोहित पोवार, रोहित देसाई यांनी केलेल्या चढायांत धार नव्हती. त्यांच्या कैलास पाटीलला मध्यफळीत खेळताना चेंडूवर नियंत्रण ठेवणे जमत नव्हते. शिवाजी तरुण मंडळाकडून कौशी, रोहन आडनाईक, किमरन फर्नांडिस, योगेश कदम एकमेकांना शॉर्ट पास देत होते. पाटाकडीलच्या बचावफळीतून त्यांचे गोलमध्ये रूपांतर होत नव्हते.
उत्तरार्धात दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी आटापिटा केला. पाटाकडीलच्या प्रथमेश हेरेकरने शिवाजी तरुण मंडळाची बचावफळी भेदत आक्रमण केले. त्याने ६५ व्या मिनिटाला डाव्या पायाने मोठ्या डीतून मारलेला चेंडू शिवाजी तरुण मंडळाच्या गोलजाळीत विसावला. या गोलची परतफेड करण्यासाठी शिवाजी तरुण मंडळाचे खेळाडू इरेला पेटले. त्यात विलास पाटीलला दुसरे यलो कार्ड मिळाले. दोन कार्डांचे रूपांतर रेडमध्ये झाल्याने त्याला मैदान सोडावे लागले. दहा खेळाडूंवर खेळताना शिवाजी तरुण मंडळाच्या खेळाडूंनी भेदक चढाया केल्या. या वेळेत पाटाकडीलच्या कैलास पाटीलने खेळाडूंना चांगले पास दिले. शिवाजी तरुण मंडळाकडून संदेश कासारने मारलेला फटका पाटाकडीलचा व्हिक्टर जॅक्सनने अडवला. करणने दिलेल्या पासवर शिवाजी तरुण मंडळाच्या खेळाडूंना चेंडू पाटाकडीलच्या गोलजाळीत ढकलता आले नाही. तत्पूर्वी, फुलेवाडीकडून स्टेन्लीने ४१, ४८, तर मंगेश दिवसेने ५० व्या मिनिटाला गोल केला. ऋणमुक्तेश्वरकडून सिद्धेश मोगणे व फुलेवाडीकडून साहिल पेंढारीने ७५ व्या मिनिटाला गोलची नोंद केली.
---
आजचे सामने
- कोल्हापूर पोलिस फुटबॉल संघ विरुद्ध झुंजार क्लब, वेळ - दुपारी २ वाजता
- दिलबहार तालीम मंडळ (अ) विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ, वेळ - दुपारी ४ वाजता.
--
चौकट
समर्थकांची स्टेडियमबाहेर घोषणाबाजी
हुल्लडबाज समर्थकांनी खेळाडूंना शिवीगाळ केली. त्यामुळे सामन्यात तणाव निर्माण झाला. सामना संपल्यानंतर त्याचे पडसाद उमटले. दोन्ही संघांच्या समर्थकांनी स्टेडियमबाहेर जाऊन जोरदार घोषणाबाजी केली.