विद्यापीठात दीक्षांत समारंभाच्या तयारीला वेग

विद्यापीठात दीक्षांत समारंभाच्या तयारीला वेग

81907
...
दीक्षान्त समारंभाच्या तयारीला वेग

पदवी प्रमाणपत्रांची छपाई पूर्ण; कॅम्पसची स्वच्छता, सुशोभीकरण

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १० ः सहा दिवसांवर असलेल्या दीक्षान्त समारंभाची शिवाजी विद्यापीठ प्रशासन आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून वेगाने तयारी सुरू आहे. यंदा विद्यार्थ्यांना प्रदान केल्या जाणाऱ्या सुमारे ६७ हजार पदवी प्रमाणपत्रांची छपाई पूर्ण झाली आहे. विद्यापीठ कॅम्पसची स्वच्छता आणि सुशोभीकरणाचे काम सध्या सुरू आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यंदाचा दीक्षान्त समारंभ होणार आहे. या समारंभाबाबत व्यवस्थापन परिषदेच्या सूचनेनुसार गेल्या आठवड्यापासून विद्यापीठ प्रशासन आणि परीक्षा मंडळाकडून तयारी सुरू झाली. त्यात विविध क्षेत्रांतील आणि विद्यापीठ कार्यक्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रण पात्रिका पाठविणे, त्यांची बैठक व्यवस्था, ग्रंथ महोत्सव, ग्रंथ दिंडीचे नियोजन, समारंभ होणारे सभागृह आणि मुख्य इमारतीसमोरील कॅम्पसची स्वच्छता, सुशोभीकरण, रस्त्यांची डागडुजी आदी स्वरूपातील कामे प्रशासनाकडून सुरू आहेत. या समारंभाच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहून १६ हजार ५०० विद्यार्थी पदवी प्रमाणपत्र घेणार आहेत. ती प्रमाणपत्रे तयार आहेत. प्रशासनाच्या सूचनेनुसार विविध समित्यांच्या माध्यमातून अन्य तयारी सुरू असल्याचे परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी आज सांगितले.
..................

ग्रंथमहोत्सवातील स्टॉल भाडे माफ करा

दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या ग्रंथमहोत्सवातील स्टॉलसाठी आकारले जाणारे २ हजार रुपये भाडे माफ करून मोफत अथवा नाममात्र भाडे घ्यावे. ग्रंथ विक्रेत्यांच्या स्टॉलना प्राधान्य द्यावे. किमान सहा टेबल मोफत द्यावेत, अशा विविध मागण्या कोल्हापूर जिल्हा प्रकाशक-ग्रंथ विक्रेते मंचने केले. त्याबाबतचे निवेदन या मंचने कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांना दिले. यावेळी युवराज कदम, दादासाहेब जगदाळे आदी उपस्थित होते.
.....................

राज्यपाल आल्यास आंदोलन करणार

छत्रपती शिवरायांचा वारंवार अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी दीक्षान्त समारंभासाठी कोल्हापुरात येऊ नये. ते आल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकप) जिल्हा कौन्सिलने दिला. त्याबाबतचे निवेदन प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांना दिले. राज्यपालांच्या हस्ते पदवी स्वीकारू नका, असे आवाहन आम्ही विद्यार्थ्यांना करणार असल्याची माहिती भाकपचे शहर सेक्रेटरी रघुनाथ कांबळे यांनी दिली. यावेळी रमेश वडणगेकर, दिलदार मुजावर, शहबाज मोमीन, उत्कर्ष पोवार आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com