मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रेस बातमी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रेस बातमी

82115
कोल्हापूर : कणेरी मठ येथील सुमंगल लोकोत्सवाची पाहणी शनिवारी (ता. ११) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी त्यांनी शेतामध्ये हातात भाजी-भाकरी घेऊन जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, काडसिद्धेश्वर स्वामी, तसेच राजेश क्षीरसागर. (बी. डी. चेचर : सकाळ छायाचित्रसेवा)

सुमंगल लोकोत्सवातून पर्यावरण संतुलनाचा विचार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; कणेरी मठावर तयारीची पाहणी, सर्वांना सहभागाचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश या पंचमहाभुतांनी सृष्टीची निर्मिती झाली आहे. या पंचतत्वांचा विचार व्यापक अर्थाने मांडणारा हा लोकोत्सव आहे. पर्यावरणीय संतुलनाचा शाश्‍वत विचार या लोकोत्सवात विविध प्रदर्शने, उपक्रम आणि प्रबोधनातून मांडला जाणार आहे. राज्य सरकार या महोत्सवाला सर्वोतोपरी सहाय्य करणार असून अधिकाधिक व्यक्तींनी या लोकोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
कणेरी मठ येथे २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत सुमंगल लोकोत्सव होणार आहे. याची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या तयारीची पाहणी करून महोत्सवातील उपक्रमांचा आढावा घेतला. अदृश्‍य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी त्यांना सुमंगल लोकोत्सवाच्या तयारीची माहिती दिली. त्यानंतर शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘साऱ्या विश्‍वाला मार्गदर्शन करणारा हा महोत्सव आहे. सध्या जागतिक तापमानात वाढ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, हिमशिखरांचे वितळणे, महासागरातील वादळे, भूस्खलन अशा अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. या सर्वांवरील उत्तर या लोकोत्सवात मिळणार आहे. इथे जैविक शेतीची मॉडेल्स पाहायला मिळणार आहेत. विषमुक्त शेतीची संकल्पना मांडली आहे. रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रीय पद्धतीने शेती करून अधिकाधिक उत्पन्न घेतल्याची उदाहरणे प्रत्यक्ष पाहायला मिळतात. इथे असणाऱ्या देशी गायींच्या पंचगव्याचा उपयोग करून विविध पदार्थ, वस्तू आणि खते बनवली जातात हे देखील इथे पाहायला मिळते. क्लस्टर शेती, मृदसंधारण अशा अनेक गोष्टी इथे पाहायला मिळतात. अधिकाधिक जणांनी या महोत्सवामध्ये सहभागी व्हावे.’’
यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागार, माजी आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, सिद्धगिरीचे विश्वस्त उदय सावंत, संतोष पाटील, डॉ. संदीप पाटील, शंकर पाटील, माणिक पाटील-चुयेकर, प्रताप कोंडेकर, डॉ. विवेक हळदवणेकर, यशोवर्धन बारामतीकर, डॉ. रवींद्र सिंग, मदन कुलकर्णी, प्रल्हाद जाधव, विक्रम पाटील उपस्थित होते.
---------------------
चौकट
महिला बचतगटांना प्रोत्साहन
राज्यातील आठवडा बाजारांसाठी लवकरच एक योजना कार्यान्वित करणार असून प्रत्येक जिल्हास्थानी महिला बचतगटांच्या उत्पादनासाठी स्टॉल उभारले जाणार आहेत. त्यासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
-------
पालकमंत्र्यांची आढावा बैठक
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानंतर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कणेरी मठावरच सुमंगल महोत्सवाच्या तयारीची आढावा बैठक घेतली. बैठकीत त्यांनी येथील सुरक्षा व्यवस्था, प्रशासकीय तयारी याबाबतची माहिती घेतली. जिल्ह्यातील सर्व शाळांना या महोत्सवात सहभागी होण्याच्या सूचना दिल्या असून या महोत्सवाला सर्वोतोपरी सहकार्य करा, असे अधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी काडसिद्धेश्वर स्वामी यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com