
ट्रक अपघात बातमी
फोटो
...
मद्यधुंद ट्रकचालकाने दुचाकींना ठोकरले
फुलेवाडी रस्त्यावर अपघातः चालकाला नागरिकांची मारहाण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.१२ ः मद्यधुंद ट्रकचालकाने रस्त्यावरील दुचाकींना धडक देऊन उडवल्याचा थरार आज रात्री नागरिकांनी अनुभवला. गगनबावडा महामार्गावरील कळे, फुलेवाडी येथे त्याने दुचाकींना धडक दिली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही; मात्र नागगरिकांनी ट्रकचा पाठलाग करून त्या चालकाला पकडले आणि बेदम चोप दिला. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
शीतल काशिनाथ शिपुगडे (वय ३२, रा. बापट कॅम्प) असे ट्रकचालकाचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक नागरिक आणि पोलिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल हा राजापुरातून बांधकामासाठी वापरले जाणारे चिरे ट्रकमधून घेऊन कोल्हापूरला येत होता. कळे येथे त्याने एका धाब्यावर थांबून मद्यप्राशन केले. त्याच अवस्थेत तो ट्रक चालवत कोल्हापूरच्या दिशेने निघाला. काही अंतर गेल्यावर त्याने रस्त्यातील दुचाकींना धडक दिली. या धडकेत दुचाकी काही अंतरावर जाऊन पडल्या. शीतलने याकडे दुर्लक्ष केले आणि तो तसाच पुढे निघून गेला. त्यानंतर फुलेवाडी येथे आल्यावरही त्याने आणखी काही दुचाकींना धडक दिली. सुदैवाने दोन्ही धडकांमध्ये कोणीही जखमी झाले नाही; मात्र दुचाकींचे मोठे नुकसान झाले. शीतल तसाच पुढे निघून जात होता; मात्र पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्याला अडवले आणि ट्रकमधून बाहेर खेचले. त्यानंतर त्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. तेथील काही नागरिकांनी या घटनेची माहिती तत्काळ करवीर पोलिसांना दिली. लगेचच करवीर पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी लोकांच्या तावडीतून चालकाला बाजूला केले. करवीर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या अपघातात जरी कोणी गंभीर जखमी झाले नसले तरी प्रत्यक्षात जो थरार परिसरातील लोकांनी अनुभवला, त्यामुळे या परिसरात घबराटीचे वातावरण आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली.
-------------------------------------------------
ट्रकचा टायर फुटला
मद्यधुंद अवस्थेत असलेल्या शीतलला ट्रकचा टायर फुटल्याचेही भान नव्हते. ट्रकचा एका बाजूचा टायर पूर्णपणे फुटला होता. केवळ व्हिलवर ट्रक काही अंतर चालून आला होता.
---------------------------------
कळे रस्ता बनला धोकादायक
कळे ते गगनबावडा रस्ता धोकादायक बनला आहे. काही दिवसांपूर्वी याच परिसरात उसाचा ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा मृत्यू झाला होता. ऊस वाहतुकीमुळे येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
---------------------------