शिवजयंती तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवजयंती तयारी
शिवजयंती तयारी

शिवजयंती तयारी

sakal_logo
By

8255, 82559

शिवजयंतीसाठी शिवप्रेमींची जय्यत तयारी
प्रबोधनात्मक कार्यक्रमांवर भर, बालचमूंकडून शिवछत्रपतींच्या पुतळ्यांची खरेदी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : यंदाची शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यासाठी शिवप्रेमी सज्ज झाले आहेत. ‘शिवराय मनामनांत...शिवजयंती घराघरांत,’ असे वातावरण निर्माण झाले असून, शिवजयंती सप्ताह साजरा करताना प्रबोधनात्मक कार्यक्रम साजरे करण्यावर भर दिला जात आहे.
१९ फेब्रुवारीला शिवजयंती आहे. पापाची तिकटीवरील कुंभार गल्ली, बापट कँप व शाहूपुरी कुंभार गल्लीत शिवछत्रपतींचे पुतळे विक्रीसाठी ठेवले आहेत. अश्‍वारूढ, सिंहासनारूढ रूपातील पुतळ्यांची बालचमूंकडून खरेदी केली जात आहेत. एक फूट पुतळ्यांच्या किमती हजार रुपयांपासून पुढे आहेत. गल्ली-बोळांत त्यांच्याकडून छोटे मंडप उभारले जात आहेत.
भगवे झेंडे, टोप्या, पताकांची विक्री सुरू आहे. शिवाजी पेठ, मंगळवार पेठेसह उपनगरांत शिवजयंतीची जय्यत तयारी सुरू आहे. उभा मारुती चौकात शौर्यपीठाचे काम वेगाने सुरू आहे. शिवजयंतीच्या शुभेच्छांचे पोस्टर्स उभारले आहेत. मिरजकर तिकटीवर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे मोठे कटआऊट उभारले असून, ‘प्रतापगडाचा रणसंग्राम’ महानाट्यासाठी स्टेज उभारणीचे काम सुरू आहे.
किल्ले पन्हाळगडावरून शिवज्योत आणण्यासाठी ग्रामीण भागातील मंडळांची लगबग सुरू आहे. त्यासाठी चारचाकी वाहनांचे बुकिंग केले जात आहे. विशेष म्हणजे शहरातील काही मंडळांनी सायकलवरून शिवज्योत आणण्याचे नियोजन केले आहे. शिवकालीन युद्धकला पथकांना प्रात्यक्षिके सादर करण्यासाठी ठिकठिकाणांहून आमंत्रण आले आहे. त्यांचाही जोरदार सराव सुरू आहे.

चौकट
पोलिसांचे आवाहन
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करून ध्वनिक्षेपक मर्यादित डेसिबलमध्ये लावावेत, असे आवाहन शहर पोलिस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांनी केले. वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, मिरवणुकीत पाळीव प्राण्यांना सहभागी करून घ्यायचे असेल तर संबंधित विभागाची परवानगी घ्यावी, धार्मिक भावना दुखावणारे पोस्टर्स उभारू नयेत, विद्युत रोषणाई करताना महावितरणच्या शहर अभियंत्यांचा सल्ला घ्यावा, मिरवणुकीतील वाहनांची तपासणी करून घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.