
डीवायपी कारखाना कोटकर पत्रक
कोणताही संबंध नसताना
टीका करणारे दिलीप पाटील कोण?
उपाध्यक्ष बी. डी. कोटकर ः वैफल्यातूनच बेताल आरोप केल्याची टीका
कोल्हापूर, ता. १३ ः ‘ज्या पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचे दिलीप पाटील हे सभासद सुद्धा नाहीत, त्यांनी डी. वाय. पाटील कारखान्याची मापे काढायचे कारण काय?,’ असा सवाल डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बी. डी. कोटकर यांनी केला आहे.
कारखान्याचे साधे सभासद सुद्धा नसताना त्यांना या कारखान्याबद्दल बोलण्याचा काय अधिकार? वास्तविक छत्रपती राजाराम कारखान्यातील यांची सत्ता जाणार असल्यामुळे वैफल्यातूनच त्यांनी हे आरोप केल्याची टीकाही त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी पन्हाळा-बावडा मतदारसंघाचे आमदार असताना गगनबावड्यासारख्या डोंगराळ व आर्थिकदृष्ट्या मागास भागात कारखाना उभारण्याचे वचन तेथील जनतेला दिले होते. महाराष्ट्रातील ‘चेरापुंजी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात एकही उद्योग उभा राहू शकत नव्हता. परंतु आमदार सतेज पाटील, दिवंगत उदयसिंह उर्फ बाळ पाटील यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे आव्हान स्वीकारून या ठिकाणी हा अत्याधुनिक सहकारी साखर कारखाना उभा केला. कारखाना रजिस्ट्रेशन करताना सप्तगंगा सहकारी साखर कारखाना म्हणून नोंदवण्यात आला. त्यानंतर सहा महिन्यातच तेथील ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांनी या कारखान्याचे नाव डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना असे करावे, अशी आग्रही मागणी केल्यामुळे या कारखान्याचे नामकरण पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना असे केले आहे.
आमदार सतेज पाटील व सहकाऱ्यांनी गावागावांत जाऊन जनजागृती करून कारखाना उभा केला. त्यातून गगनबावडा, पन्हाळा, राधानगरी, करवीर भागातील गरजू युवकांना रोजगार मिळाला. तालुक्यात इतर लहान-मोठे उद्योग- व्यवसाय उभारण्यास मदत केली. गेल्या वीस वर्षांत कारखान्याची गाळप क्षमता वाढवून, विविध प्रकल्प उभारून जिल्ह्यात आदर्श निर्माण केला. प्रत्येक हंगामात सर्वप्रथम ‘एफआरपी’पेक्षा जादा ऊसदर देऊन जिल्ह्यात जास्तीत जास्त ऊसदर देणाऱ्या सहकारी कारखान्यांमध्ये अग्रेसर राहण्याचे काम केले आहे. याउलट दिलीप पाटील ज्या कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम करतात, त्या कारखान्याने गेल्या २८ वर्षांत कोणताही प्रकल्प उभा केलेला नाही. कारखान्याची वार्षिक सभाही पाच ते दहा मिनिटांमध्ये गुंडाळली जाते, ही लोकशाही आहे का? असा सवालही त्यांनी पत्रकातून केला आहे.