
शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ स्थगित
शिवाजी विद्यापीठाचा
दीक्षांत समारंभ स्थगित
प्रशासनाचा निर्णय; स्नातकांना ‘एसएमएस’द्वारे माहिती
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः चार दिवसांवर असलेला शिवाजी विद्यापीठाचा ५९ वा दीक्षांत समारंभ आज स्थगित करण्यात आला आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे परीक्षा कामकाजावर बहिष्कार आंदोलन सुरू आहे. त्यातील पुढील टप्पा असलेला एकदिवसीय लाक्षणिक संप गुरुवारी (ता. १६) आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने दीक्षांत सोहळा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावर्षीच्या दीक्षांत समारंभासाठी इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशनचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे प्रमुख पाहुणे होते. माजी कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अध्यक्षस्थानी निश्चित झाले होते. यंदासाठीच्या ६६ हजार ४५७ पदवी प्रमाणपत्रांची छपाई पूर्ण झाली. गुरुवारी होणाऱ्या या समारंभाच्या निमंत्रण पत्रिकांची छपाई, तर काहींचे वितरण करण्यात आले. मंडप उभारणी, ग्रंथमहोत्सव, दिंडीचे नियोजन अशा जय्यत तयारीने वेग घेतला असताना रविवारी कोश्यारी यांचा राज्यपालपदाचा राजीनामा मंजूर झाला. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन या समारंभाबाबत कोणता निर्णय घेणार, याकडे विद्यापीठ घटक, कोल्हापूरकरांचे लक्ष लागून राहिले होते. त्यातच शिवाजी विद्यापीठ सेवक संघाने गुरुवारी लाक्षणिक संपाबाबतचे पत्र विद्यापीठ प्रशासनाला दिले. त्यावर प्रशासनाने काही अपरिहार्य कारणास्तव समारंभ स्थगित करत असल्याचा निर्णय सायंकाळी जाहीर केला.
दरम्यान, सन २००८ मध्ये विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी तत्कालीन केंद्रीय मंत्री डी. पुरंदरेश्वरी यांना प्रमुख पाहुणे म्हणून प्रशासनाने निमंत्रित केले होते. त्यांनी उपस्थितीबाबत सकारात्मकता दर्शविल्यानंतर प्रशासनाने तयारी केली. मात्र, अचानकपणे प्रमुख पाहुण्यांनी येणार नसल्याचे कळविल्याने विद्यापीठाने दीक्षांत समारंभ स्थगित केला होता.
विद्यापीठ सेवक संघाने लाक्षणिक संपाबाबतचे पत्र प्रशासनाला दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर दीक्षांत समारंभ स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या बाबतची माहिती स्नातक, विद्यार्थी यांना ‘एसएमएस’द्वारे दिली आहे. या समारंभाची नवीन तारीख निश्चित झाल्यानंतर जाहीर केली जाईल.
- डॉ. अजितसिंह जाधव, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ
नव्या राज्यपालांना निमंत्रण?
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी १३ जानेवारी रोजीच बहिष्कार आंदोलनानंतरचे पुढील टप्पे जाहीर केले होते. त्यात एकदिवसीय लाक्षणिक संपाचा देखील समावेश होता; मात्र राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशीच विद्यापीठ प्रशासनाने दीक्षांत समारंभ स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे दीक्षांत समारंभाला नव्या राज्यापालांना निमंत्रण देण्यासाठीच प्रशासनाने या संपाचे कारण पुढे केले आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत असल्याची प्रतिक्रिया ‘सुटा’चे प्रमुख कार्यवाह डॉ. डी. एन. पाटील यांनी दिली.