मटका, गुटखा ‘ओपन’; कारवाई ‘क्लोज’

मटका, गुटखा ‘ओपन’; कारवाई ‘क्लोज’

फोटो देत आहे
---------------------
मटका, गुटखा ‘ओपन’; कारवाई ‘क्लोज’

‘हातकणंगले’त गुन्हेगारीचा चढता आलेख ः अधिकाऱ्यांची उचलबांगडी

हातकणंगले पोलिस ठाण्याच्या हद्दीत अलीकडे गुन्हेगारीचा आलेख नेहमीच चढता राहिला आहे. मटका, गुटखा विक्री खुलेआम सुरू आहे. घरफोडी, वाटमारी, छेडछाड, औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना मारहाण, त्यांची लूटमार असे प्रकार उघडपणे घडत आहेत. अनेक गुन्ह्यांची पोलिस दफ्तरी नोंद होऊनही कारवाई मात्र शून्य आहे. पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांचे गुन्हेगारांशी असलेले लागेबांधेही त्याला कारणीभूत आहेत. हे लागेबांधे याआधीही उघड झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचा ‘खाकी’वरील विश्वासच उडला आहे. त्याचा वेध घेणारी मालिका....
------------------
अतुल मंडपे ः सकाळ वृत्तसेवा
हातकणंगले, ता. १३ ः पोलिस उपाधीक्षकांच्या विशेष पथकाने महिनाभरापूर्वी एकाच वेळी चार ठिकाणी कारवाया केल्या. पण काही दिवसांतच हातकणंगले पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मटका पुन्हा एकदा ‘ओपन’ झाला, तर कारवाया ‘क्लोज’ झाल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे महिन्यापूर्वी केलेली ती कारवाई निव्वळ फार्स होता की काय, अशी शंका सर्वसामान्यांतून उपस्थित होत आहे. यातूनच तत्कालीन पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांच्यावर कसूर केल्याचा ठपका ठेवत उचलबांगडीची कारवाई केली. त्यांच्या जागी निरीक्षक महादेव तोंदले यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यासमोर सध्या तरी गुन्हेगारी मोडून काढण्याचे मोठे आव्हान असून त्यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हातकणंगले ठाणे हद्दीमध्ये आळते, कुंभोज, हातकणंगले, रुकडी, हेरले, मुडशिंगी, रुई, आभार फाटा, लक्ष्मी औद्योगिक वसाहत अशा विविध ठिकाणी मटका, गुटखा उघड सुरू आहे. रोज यामध्ये कोट्यवधींची उलाढाल होत असते. अनेकांचे संसार देशोधडीला लागले असून, बुकी मालक मात्र मालामाल झाले आहेत.
कमी श्रमात झटपट पैसा, झटपट श्रीमंती, झटपट रूबाब या भुलभुलैय्याच्या योजनेत विविध व्यावसायिकांबरोबरच काही लोकप्रतिनिधींनीही अतिस्वार्थापोटी गुंतवणूक केली आहे. त्यातूनच हद्दीच्या वादातून अनेक वेळा वादावादी, हाणामारी, अगदी भरचौकांत चाकूहल्ल्यापर्यंत घटना घडूनही पोलिस यंत्रणा मात्र सुस्तच आहे. त्यामुळेच अशा फाळकूटदादांची हिंमत वाढत चालली आहे.
अगदी पोलिस ठाण्याला लागूनच अनेक टपऱ्यांत त्यांच्या डोळ्यांदेखत मटका सुरू असल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. एरव्ही सर्वसामान्यांना कारवाईची भीती दाखवणारे पोलिसांचे हात कशामुळे बांधले आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे...
(क्रमशः)
-----
पोलिसांच्या गाडीतून ‘त्या’चा वावर
हातकणंगले येथील अवैध व्यावसायिकाने सामाजिक कार्यकर्त्याचा बुरखा पांघरला आहे. त्याने तर ‘पोलिस, एलसीबी माझ्या खिशात आहेत,’ म्हणत अशी भीती अनेकांना घातली आहे. अनेक वेळा अनेकांना त्याचे पोलिस गाडीतून पोलिसांबरोबर दंगामस्ती करतानाचे दर्शन झाल्याने सर्वसामान्यांमध्ये संभ्रम आहे. त्याची काही ठराविक कर्मचाऱ्यांसमवेत पोलिस ठाण्यांतील ऊठबस चर्चेचा विषय ठरला आहे.

--------
कोट..
कर्तव्यांत कसूर केल्यामुळेच याआधीच्या अधिकाऱ्यांवर बदलीची कारवाई झाली आहे. असे प्रकार परत सुरू असतील तर कोणाचीही गय केली जाणार नाही.
- रामेश्वर वैजणे, पोलिस उपाधीक्षक, हातकणंगले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com