
महिलेच्या वेशात एटीएम फोडण्याचा प्रयत्न
82604
...
महिलेच्या वेशात एटीएम फोडण्याचा प्रयत्न
संभाजीनगर येथील प्रकार : रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः महिलेच्या वेशात येऊन एटीएममध्ये चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला मध्यरात्री जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. अंकुश नामदेव कोंडारे (वय ३२, रा. नाळे कॉलनी, संभाजीनगर) असे त्याचे नाव आहे. संभाजीनगर रोडवर रात्री पावणेदोनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याबाबतची फिर्याद उत्तम भीमराव राणे यांनी दिल्याची माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्यातून दिली.
पोलिसांनी सांगितले की, संभाजीनगर परिसरातील एक बॅंकेच्या एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न होत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यामुळे जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील गस्तीचे पथक तातडीने रवाना झाले. त्यांनी एटीएमजवळ जाऊन पाहणी केली. यावेळी पंजाबी ड्रेस, ओढणीने चेहरा बांधून एटीएममध्ये चोरी करण्याचा प्रयत्न एक महिला करीत असल्याचे दिसून आले. तेव्हा पंजाबी ड्रेस, गुलाबी रंगाचा पायजमा, तोंडाला काळा स्कार्फ अशा महिला वेशात रेकॉर्डवरील गुन्हेगार अंकुश कोंडारे हाच असल्याचे गस्तीवरील पथकाला दिसून आले. एटीएममध्ये घुसून मशिनचा ‘हुड डोअर’ उघडून चोरी करण्याचा प्रयत्न तो करीत होता. हा प्रकार परिसरातील एका व्यक्तीने पाहिल्यानंतर त्याने पोलिसांना कळविले होते. त्यामुळे गस्ती पथक तातडीने पोहोचणे शक्य झाले. दरम्यान, एटीएमच्या सर्व्हरवरूनही याची माहिती पुढे आल्याचे सांगण्यात आले.
------------
कोंडारे रेकॉर्डवरील गुन्हेगार
अंकुश कोंडारे हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याला जुना राजवाडा पोलिसांनी २०१८ मध्ये चार घरफोड्यांच्या कारणावरून अटक केली होती. तसेच गतवर्षीही त्याच्याकडून एक चोरी उघडकीस आणली आहे. गेली काही दिवस पोलिस त्याच्या शोधात होते. तो कोल्हापुरात भाड्याच्या घरात राहत होता. सध्या तो बार्शी (जि. सोलापूर) येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्याचे आई-वडील मिळेल त्या ठिकाणी मोलमजुरी करून पोट भरत असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.