
भविष्यकालीन विस्ताराचा विचार बजेटमध्ये दिसावा
लोगो- ‘आमचं शहर- आमचं बजेट’
-
82494
शहराच्या भविष्यातील विस्ताराचा विचार व्हावा
पर्यटनस्थळे विकसित केली तर रोजगारासह महापालिकेचा महसूलही वाढेल
कोल्हापूर, ता. १४ ः शहराच्या विस्ताराचा भविष्यकालीन विचार करून विकास आराखडा बनवला पाहिजे. त्यासाठी निधीची तरतूदही केली पाहिजे. यामध्ये रुंद रस्ते, उड्डाणपूल, शहर सुशोभीकरण, आरोग्याच्या व्यापक सुविधा यांसह ई-गव्हर्नन्ससारख्या सुविधा निर्माण करण्यासाठी बजेटमध्ये आर्थिक तरतूद असावी, असा विचार ‘सकाळ’च्या ‘आमचं शहर- आमचं बजेट’ उपक्रमात विविध विषयांतील तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडला.
शहरात दरवर्षी सहा ते सात लाख वाहनांची नोंद होते. भविष्यात ही संख्या वाढणार आहे. त्या दृष्टिकोनातून रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक आहे. आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यासाठी राज्य, केंद्राच्या निधीचे नियोजन करावे. आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी सावित्रिबाई फुले रुग्णालयाची क्षमता वाढवावी. कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन केल्यास त्यातूनही उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होऊ शकतात. सध्याचा काळ ई गव्हर्नन्सचा आहे. त्यामुळे घरफाळा, पाणी बिल ऑनलाईन झाल्यास नागरिकांसाठी सोयीचे होईल. तसेच त्यातील भ्रष्टाचारही कमी होईल. उपग्रह सर्वेक्षणातून घरफाळा नोंदी झाल्यास सर्व मिळकतींची नोंद होईल. त्यातूनही उत्पन्न वाढू शकते. महापालिकेने पर्यटनस्थळे विकसित केली तर रोजगारासह महापालिकेचा महसूलही वाढेल.
दिलीप देसाई, अध्यक्ष, प्रजासत्ताक संस्था- नागरिकांना उद्याने, जलतरण तलाव, मैदाने या मूलभूत सुविधा देण्यात महापालिका अपयशी ठरते. अशा वेळी जर बीओटी तत्वावर या पायाभूत सुविधांची उभारणी केली गेली तर नागरिकांना सुविधाही उत्पन्न होतील आणि महापालिकेला उत्पन्नही मिळेल. शहराची हद्दवाढ झाली पाहिजे.
......
विनायक रेवणकर, रस्ते व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तज्ज्ञ- शहरातील प्रमुख रस्ते रुंद करावेत. पे अँड पार्कचे नवे पर्याय दिले पाहिजेत. रस्ते आणि सार्वजनिक वाहतुकीचे योग्य नियोजन केले तर वाहतूक कोंडी, हवा आणि ध्वनी प्रदूषण कमी होईल. तसेच महापालिकेला उत्पन्नही मिळेल.
......
अवधूत भाट्ये, अध्यक्ष, नेशन फर्स्ट संस्था- सार्वजनिक आरोग्य हा नेहमीच ऐरणीवरचा विषय असतो. आरोग्यासाठीचा निधी तेथेच खर्ची पडला पाहिजे. सावित्रिबाई फुले दवाखान्याची डागडुजी आवश्यक आहे. एन.आय.सी.यू. च्या माध्यमातून आलेला ८० लाखांचा निधी अद्याप खर्ची पडलेला नाही. आरोग्य व्यवस्थेसाठी प्राधान्याने निधी द्यावा.
.....
सतीश डकरे, चार्टर्ड अकौंटंट- महापालिकांच्या जागांचा योग्य वापर झाल्यास अधिक महसूल मिळेल. पर्यटन हा उत्पन्नाचा एक प्रमुख स्त्रोत होऊ शकतो. त्या दृष्टीने महापालिकेच्या बजेटमध्ये तरतूद केली पाहिजे. सेवा आणि सुविधांच्या माध्यमातून महसूल वाढवता येऊ शकतो.
.....
प्रताप पाटील, अध्यक्ष, आयटी असोसिएशन- आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभावी वापर करून विविध प्रकारच्या सेवा देता येऊ शकतात. यामधील मानवी हस्तक्षेप टाळला गेल्यामुळे भ्रष्टाचार कमी होईल.
-------------------------------------------------------------
सूचना अशा...
- बीओटी तत्वावर महापालिकेने प्रकल्प राबवावेत
- ई-गव्हर्नन्स सेवा वाढवाव्यात
- पर्यटन क्षेत्रातून महसूल मिळवावा
- शहरातील रस्ते प्रशस्त करावेत
- शहराची हद्दवाढ करावी
- प्रभावी आरोग्य सेवा द्याव्यात
--------------------------------------------------------------------
चौकट
महापालिका सल्लागार समिती आवश्यक
विविध विषयांतील तज्ज्ञ, अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची एक समिती करावी. या समितीने महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना विकासकामांबद्दल मार्गदर्शन करावे. त्यामुळे शहराच्या विकासाला योग्य दिशा मिळेल, असेही तज्ज्ञ मंडळींनी सुचवले आहे.