
उपपदार्थ महागले
पनीर, खवा, श्रीखंड, बासुंदी महागणार
दूध दर वाढीचा परिणाम; चहाच्या दरातही वाढ होण्याची शक्यता
कोल्हापूर, ता. १४ ः जिल्ह्यातील सर्वच दूध संघांनी दूध खरेदी व विक्री दरात वाढ केल्याचा परिणाम दुधापासून तयार होणाऱ्या उपपदार्थांच्या दरावर होणार आहे. काही दिवसांत दुधापासून तयार होणारे पनीर, खवा, श्रीखंड, बासुंदी, दही, ताक हे पदार्थ प्रती किलो दहा ते पंधरा रुपयांनी महागणार आहेत. चहाच्या दरावरही परिणाम होणार आहे. पाच रुपयांना मिळणारा कटिंग चहा आता सहा रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. एक-दोन दिवसांत यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील गोकुळ, वारणा व इतर संघ, तसेच जिल्ह्यात बाहेरून आलेल्या अमूल, हॅटसन या दूध संघांनी दूध खरेदी व विक्री दरात वाढ केली आहे. गोकुळसह वारणा संघाकडून दुधापासून उपपदार्थ बनवले जातात. याशिवाय शहरात २० ते २५ तर ग्रामीण भागात तीसपेक्षा जास्त खासगी डेअऱ्यांकडून उपपदार्थ बनवले जातात. संघांच्या तुलनेत या खासगी डेअऱ्यांचे दर कमी असल्याने आणि मागणीच्या तुलनेत संघाकडून पुरेसा पुरवठा होत नसल्याने अशा खासगी डेअऱ्यांकडून रोज मोठ्या प्रमाणात उपपदार्थांची मागणी आहे. सध्या लग्न सराई असल्याने ही मागणी पूर्ण करताना मालकांची दमछाक होत आहे.
दुधापासून उपपदार्थ तयार करण्यासाठी एकाच फॅटचे दूध लागते. हजारो लिटर दूध या डेअऱ्या संघाकडून खरेदी करतात. त्यामुळे हे दूध संघांकडूनच घेण्याशिवाय खासगी डेअऱ्यांकडे पर्याय नाही. ग्रामीण भागात फिरून दूध संकलन करणारे गवळीही मोठ्या प्रमाणात खासगी डेअऱ्यांना दूधपुरवठा करतात. काही संघासह खासगी डेअऱ्यांकडून विकल्या जाणाऱ्या उपपदार्थांचे दर जास्त आहेत; पण उत्पादन खर्च कमी असल्याने काही डेअऱ्यांकडून हेच उपपदार्थ कमी दरात विकले जात आहेत, अशा संघाकडे मागणी जास्त आहे. महिन्याभरात दुधाच्या विक्री आणि खरेदी दरात प्रती लिटर चार ते साडेचार रुपये वाढल्याने उपपदार्थ तयार करणाऱ्या डेअऱ्यांसमोर दर वाढवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. अशा डेअरीमालकांनी संघांशी पत्रव्यवहार करून हे दर कमी करण्याची मागणी केली आहे.
...............
चौकट
उपपदार्थ- सध्याचे दर (डेअरीनिहाय दर वेगळे, प्रती लिटर रुपयांत)
श्रीखंड - १३० ते १५०
फ्रुटखंड - १४० ते १५०
पनीर - २५० ते ३००
खवा - २७० ते ३००
बासुंदी - १७० ते २००
दही - ७० (साडेसहा फॅटचा दर)
ताक - ४० रुपये लिटर
.....................
चौकट
प्रती १ किलो पदार्थ तयार करण्यासाठी लागणारे दूध
श्रीखंड - तीन किलो चक्का (सव्वा तीन लिटर दूध)
फ्रुटखंड - तीन किलो चक्का
पनीर - सव्वा पाच लिटर दूध
खवा - ४ लिटर दूध
बासुंदी - दोन ते अडीच लिटर दूध
दही - १०० लिटर दुधापासून ९७ किलो