गडहिंग्लजला घर फोडून १६ तोळे दागिन्यांवर डल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लजला घर फोडून
१६ तोळे दागिन्यांवर डल्ला
गडहिंग्लजला घर फोडून १६ तोळे दागिन्यांवर डल्ला

गडहिंग्लजला घर फोडून १६ तोळे दागिन्यांवर डल्ला

sakal_logo
By

82830
गडहिंग्लज : येथील महालक्ष्मी पार्कमधील शुभांगी साळवी यांच्या फ्लॅटमध्ये मंगळवारी भरदिवसा घरफोडी झाली. घटनास्थळावरील ठसे घेताना तज्ज्ञांचे पथक. (अमर डोमणे : सकाळ छायाचित्रसेवा)

जवानाचे घर भरदिवसा फोडून
१६ तोळे दागिन्यांवर डल्ला
---
गडहिंग्लजला अपार्टमेंटमधील प्रकार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १४ : भारतीय सैन्यदलातील सुभेदार सुनील साळवी यांचा फ्लॅट आज चोरट्यांनी भरदिवसा फोडत १६ तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला.
शहरातील डॉक्टर कॉलनीतील मगदूम गल्लीतील महालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये हा प्रकार भरदुपारी एक ते दोनच्या सुमारास घडला. अपार्टमेंटमधील या चोरीने गडहिंग्लजकरांची चिंता वाढली आहे. दरम्यान, या सोन्याची किंमत पोलिस दफ्तरी चार लाख पाच हजारांपर्यंत नोंदविली असली, तरी बाजारभावानुसार त्याची किमत आठ लाखांवर होते.
पोलिसांनी सांगितले, की महालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये दुसऱ्‍या मजल्यावर फ्लॅट क्रमांक २०६ मध्ये शुभांगी सुनील साळवी मुलगा-मुलगीसह राहतात. त्यांचे पती सुनील भारतीय सैन्यदलात सुभेदार आहेत. ते रजा संपवून आठवड्यापूर्वीच सैन्यदलातील कर्तव्यावर हजर झाले आहेत. दुपारी एकच्या सुमारास स्वत:च्या फ्लॅटसह महालक्ष्मी सोसायटीचे वीजबिल भरण्यासाठी सौ. साळवी कॉलनीतीलच रवळनाथ संस्थेत गेल्या. त्यांची दोन्ही मुले शिकवणी वर्गाला गेली होती. दरम्यान, सौ. साळवी यांच्यापूर्वी पाच मिनिटे आधी त्यांचा मुलगा घरी पोचला, तेव्हा घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून त्याने त्यांना दूरध्वनी केला व दरवाजा उघडा का ठेवला, असा प्रश्‍न केला. इतक्यात सौ. साळवीही घरी पोचल्या. त्या वेळी दरवाजाचा कडी-कोयंडा कोणीतरी तोडल्याचे दिसले.
सौ. साळवी बेडरूममध्ये गेल्या. तेथील तिजोरीचा दरवाजाही उचकटल्याचे दिसले. आतील साहित्य विस्कटले होते. त्यातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचेही निदर्शनास आले. यात प्रत्येकी साडेचार तोळ्यांचे सोन्याचे बिल्वर व गंठण, अडीच तोळ्यांचा राणीहार, पावणेदोन तोळ्यांचा नेकलेस, सव्वा तोळ्याचा नेकलेस, प्रत्येकी अर्ध्या तोळ्याची अंगठी, झुमके, लॉकेट, पावली भारच्या कानातील रिंगा असे एकूण १६ तोळ्यांचे दागिने चोरीला गेल्याचे सौ. साळवी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक विक्रम वडणे तपास करीत आहेत.
घटनेची माहिती मिळताच बघ्यांची गर्दी झाली होती. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी ठसेतज्ज्ञ व श्‍वानपथकाला पाचारण केले होते. श्‍वानपथक अपार्टमेंट परिसरातच घुटमळल्याचे सांगण्यात आले.

* संशयिताला विचारला जाब...
दरम्यान, अपार्टमेंट परिसरात एक तरुण दिसताच साळवी यांनी तू कोण आहेस आणि इकडे कशासाठी आला आहेस, अशी विचारणा केली; परंतु तो काहीच न बोलता निघून गेला. त्यामुळे साळवी यांनी त्याकडे दुर्लक्ष करून पुढे गेल्या. तो अंदाजे ३० ते ३२ वयोगटातील आहे. अंगात निळा चौकड्यांचा फुल शर्ट, पांढरी जीन्स, दोन्ही कानांत पिवळ्या धातूच्या बाली, डोळ्यांवर काळा गॉगल, उलटा भांग पाडलेले लांब केस असे त्याचे वर्णन असल्याचे साळवी यांनी सांगितल्याचे पोलिस म्हणाले.