
नदीत बुडणाऱ्या तिघांना जीवनदान
82846
...
पंचगंगेत बुडणाऱ्या औरंगाबादच्या
चौघा भाविकांना जीवदान
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः औरंगाबाद येथून अंबाबाईच्या दर्शनाला आलेल्या चार भाविकांना आज पंचगंगेत बुडण्यापासून परिसरातील नागरिकांनी वाचवले. रमेश गवळी, उदय कदम आणि सुधाकर दिवटे यांनी आपला जीव धोक्यात घालून चौघांना वाचवले. सर्व भाविकांनी त्यांचे आभार मानले.
या प्रकरणी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर, गणपतीपुळे, पंढरपूर अशा धार्मिकस्थळांचे दर्शन घेण्यासाठी औरंगाबाद येथील ४० महिला व १० पुरुष असे ५० जण एसटी बसने मंगळवारी (ता.१४) सकाळी कोल्हापुरात आले. अंबाबाईच्या दर्शनासाठी जाण्यापूर्वी पंचगंगा नदी घाटावर ते अंघोळीसाठी गेले. यावेळी दगडाबाई दिवटे या पाण्यात अंघोळ करताना पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात गेल्या. यावेळी त्यांच्या बचावासाठी पुढे गेलेल्या सविताबाई कोके, राहिबाई बेडके व अन्य एक पुरुष असे चौघेजण पाण्यात बुडू लागले. दरम्यान, नदीवर अंघोळीसाठी गेलेले रमेश गवळी व त्यांच्या अन्य दोघा मित्रांनी पाण्यात उड्या मारून स्वत:चा जीव धोक्यात घालून या चौघांना पाण्यातून बाहेर काढले. रमेश गवळी यांनी गेल्या २५ वर्षांत बुडणाऱ्या १८ जणांना जीवदान दिले आहे.