आमच बजेट, आमचं शहर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमच बजेट, आमचं शहर
आमच बजेट, आमचं शहर

आमच बजेट, आमचं शहर

sakal_logo
By

82865
कोल्हापूर : ‘सकाळ’च्या ‘आमचं शहर, आमचं बजेट’ उपक्रमात सहभागी झालेले डावीकडून विजय घाटगे, दीपक देवलापूरकर, प्रसाद जाधव, श्रीकांत कदम, संभाजीराव जगदाळे, नंदकुमार शिंदे, डॉ. विजय पाटील, चंद्रकांत चिले, शिवाजीराव ढवण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)

पाणी पुरवठ्यासाठी तंत्रज्ञान वापरा
कुशल मनुष्यबळाचीही गरज; वितरण व्यवस्था सक्षम हवी, दुरुस्तीसाठीही निधीची गरज
कोल्हापूर, ता. १५ : पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी असलेल्या गळती दुरुस्तीवर अंदाजपत्रकात निधीची मोठी तरतूद केली पाहिजे. त्याचबरोबर पाणी वितरण सक्षमपणे करायचे असल्यास ‘स्काडा’सारख्या तंत्रज्ञानाची मदत घ्यावीच लागणार आहे. तरच थेट पाईपलाईनमधून चोवीस तास शुद्ध व मुबलक पाणी व्यवस्थित नागरिकांच्या घरात जाऊ शकते. यातून पाणीपुरवठा विभागाला दरवर्षीचा अपेक्षित महसूल मिळू शकतो, अशी मते शहरवासीयांनी व्यक्त केली.
महापालिकेच्या अंदाजपत्रकाच्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ने ‘आमचं शहर, आमचं बजेट’ उपक्रमांतर्गत शहरवासीयांच्या जिव्हाळ्याच्या पाणीपुरवठा विषयावर मते जाणून घेतली. बजापराव माने तालीम मंडळात झालेल्या चर्चेत निवृत्त अभियंता, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते, निवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते. पाणीपुरवठा विभागासाठी आधुनिक तंत्रज्ञान तसेच कुशल मनुष्यबळाची साथ देण्याच्या दृष्टीने अंदाजपत्रकात मोठी तरतूद केली पाहिजे, असेही सांगितले.
अनेक भागात पाणी सुरू झाले की गटारी, ड्रेनेज लाईनमधून पाणी वाहायला लागते. कुठून, कोणत्या जलवाहिनी गेल्या याची माहिती कर्मचाऱ्यांनाही नसते. परिणामी ज्या भागात जितका वेळ पाणी येते त्यातील जवळपास ४० टक्केपर्यंत पाणी गळतीतून वाहून जात असल्याची वस्तुस्थिती चर्चेत गांभीर्याने मांडली. रस्त्यावर दिसणाऱ्या गळती काढण्याचे नियोजन प्रशासन करते. पण त्याव्यतिरिक्त जुन्या अंतर्गत जलवाहिन्यांमधून होणारी गळती मोठी आहे. त्यासाठी काहीच होताना दिसत नाही. एका रस्त्याखाली चार-चार जलवाहिन्या आहेत. त्यातील दोन वापरत नसल्या तरी त्यात पाणी भरून रहाते व आवश्‍यक पाणी मिळत नाही. उपसा केंद्रांची क्षमता आता संपत आली आहे. त्यांच्या पंप दुरुस्तीसारखा खर्च विनाविलंब झाला पाहिजे. भागाभागांमध्ये टाक्या बांधल्या आहेत; पण त्यातील अनेकांमध्ये पाणी चढतच नाही. त्याला कारणीभूत मुख्य वाहिनीवर दिले गेलेले फाटे तसेच गळती आहे. या गळती, चोरीसारख्या प्रकारांना अटकाव करायचा असल्यास तंत्रज्ञानाचा अवलंब करावाच लागणार आहे. त्याला आता पर्याय नाही. तंत्रज्ञानाचेही विविध पर्याय असून अंदाजपत्रकात त्यासाठी भरीव तरतूद केली पाहिजे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. या वेळी सुधीर शिंदे, अनंत भक्त यांनीही मते व्यक्त केली.
-----------
नंदकुमार शिंदे (निवृत्त सहाय्यक अभियंता, पाणीपुरवठा) : उंच, सखल भागासाठी पाणी सोडण्याचे नियोजन हवे.
डॉ. विजय पाटील (अभियंता) : सध्याच्या प्रक्रियेत पाण्यातील इतर अशुद्ध घटकांवर प्रक्रियाच नाही.
दीपक देवलापूरकर (अध्यक्ष, जनस्वास्थ दक्षता समिती) : भूगर्भातील पाणीपातळीत भर घालण्यासाठी गटारींना छिद्र ठेवण्याची गरज आहे.
संभाजीराव जगदाळे (संचालक, कोल्हापूर अर्बन बॅंक) : वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पाणीपुरवठ्याचे नियोजन आवश्‍यक.
प्रसाद जाधव (अध्यक्ष, सिटीझन फोरम) : प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून भागनिहाय काटेकोरपणे नियोजन केले जावे.
श्रीकांत कदम (उपाध्यक्ष, रंकाळा तालीम) : तांत्रिक सुधारणांबरोबर अधिकाऱ्यांकडून व्यवस्थापन केले पाहिजे.
चंद्रमोहन पिसाळ (सचिव, बजापराव माने तालीम) : रेनवॉटर हार्वेस्टिंगविषयी कडक धोरण अवलंबावे.
विजय घाटगे (सामाजिक कार्यकर्ते) : जलवाहिन्यांचा आराखडा बनवला तरच जुन्या, नव्यांची माहिती यंत्रणेला होईल.
शिवाजीराव ढवाण (निवृत्त कर्मचारी) : पाण्याची नासाडी थांबवली पाहिजे.
चंद्रकांत चिले (सामाजिक कार्यकर्ते) : विविध ठिकाणी छोट्या टाकी उभ्या केल्यास प्रश्‍न सुटतील.
-------------
सूचना अशा...
- जुने व्हॉल्व, वाहिन्या दुरुस्त करा
- मुख्य वाहिनीवरील कनेक्शन बंद करा
- लोकसंख्येचा सर्व्हे करून नियोजन आवश्‍यक
- बालिंगा उपसा केंद्राची क्षमता असून ते बंद करू नये
- तांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती झाली पाहिजे
- पाणी वापर कमी झाला, तर प्रदूषण कमी होईल
- सांडपाण्यासाठी शोषखड्डे मारले जावेत
- चोरी रोखण्यासाठी पाणी कनेक्शन तपासणीची मोहीम कडक हवी