
बाजार समिती सभागृह
फोटो
...
शाहू सांस्कृतिक सभागृह
चालविण्याचा ठेका संपला
---
महसुलाला खीळ; सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचे कोठे, सभागृहाची डागडुजीची गरज
---
शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ ः विविध सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या शाहू सांस्कृतिक सभागृह चालविण्याचा ठेका संपला आहे. बाजार समितीत सध्या प्रशासक नियुक्त असल्याने नवीन करार झालेला नाही. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून येथील कार्यक्रमांचे बुकिंग थांबले आहे. त्यामुळे बाजार समितीचा महसूल बुडतो. त्याबरोबर कोल्हापुरात लावणी किंवा सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम घ्यायचे कोठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शेती उत्पन्न बाजार समितीने शेतकरी, व्यापारी, माथाडी, अडत्यांबरोबरच सर्वसामान्यांना शहरात कोणताही कार्यक्रम घेता यावा, यासाठी भले मोठे सभागृह बांधले. त्याला ५० वर्षे झाली. १९८० ते १९९० या काळात हे सभागृह धूळखात पडून होते. त्यानंतर काही काळ बाजार समितीने हे सभागृह चालविले, मात्र त्याला जेमतेम प्रतिसाद होता. २००५ नंतर बाजार समितीने या सभागृहाचे नूतनीकरण केले. त्यानंतर सभागृह आवारात लॉन, मागील बाजूला भोजन कक्ष तसेच स्वतंत्र तीन खोल्या, स्वच्छतागृह, आसन क्षमता अशा सुविधा केल्या. एका वेळी दीड हजारांवर प्रेक्षक बसतील, एवढी क्षमता या सभागृहाची आहे. त्यानंतर हे सभागृह भाड्याने देण्यात येऊ लागले. त्यासाठी सभागृह चालविण्याचा ठेका खासगी कंपनीला देण्यात आला. त्यांनी १५ वर्षांपासून हे सभागृह चांगले चालविले. यात लावणी नृत्याचे कार्यक्रम, नाट्यप्रयोग, राजकीय सभा, संमेलने मोठ्या प्रमाणात होऊ लागली. मात्र, करार नाममात्र भाडेपट्टीवर देण्यात आला. त्यामुळे बाजार समितीचे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोपही मागील संचालक मंडळात झाला. ज्या कंपनीला ठेका दिला होता, त्याची मुदत संपून दीड महिना झाला. त्यानुसार ठेकेदाराने हे सभागृह सध्या बाजार समितीच्या ताब्यात दिले आहे.
...
महिन्याला लाखोंचे नुकसान
बाजार समितीवर सध्या प्रशासक आहेत. नवीन करारासाठी निविदा काढलेली नाही. नवीन संचालक मंडळ अस्तित्वात येण्यासाठी बाजार समितीच्या निवडणुका व्हाव्या लागतील. त्याला आणखी दोन ते तीन महिने जातील. त्यानंतर संचालक मंडळ आल्यावर निविदा प्रक्रिया राबविण्यास दोन महिने जातील. तोपर्यंत पावसाळा आल्यावर सभागृहाला कार्यक्रम फारसे मिळत नाहीत. या साऱ्यात किमान सहा ते आठ महिने जातील. दरमहा किमान दीड-दोन लाखांचे भाडे धरले तरी बाजार समितीचे २० ते २५ लाखांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
...
‘‘सभागृहाची इमारत बांधून ५० वर्षे झाली आहेत. इमारत जुनी झाल्याने त्याचे स्टक्चरल ऑडिट करावे लागेल. त्यानंतर गरजेनुसार डागडुजी करावी लागेल. त्यासाठी सहकार विभागाची मान्यता घेऊन हे काम सुरू करण्याबाबत प्रशासक मंडळात चर्चा झाली आहे. त्यानुसार अपेक्षित पाठपुरावा ही सुरू आहे. लवकरच हा विषय मार्गी लागेल.’’
- जयवंत पाटील, सचिव, बाजार समिती