
सुमंगल लोकोत्सव
83077
...
२८ राज्यांतील भाविक अन् ५० देशांतील पाहुणे
सुमंगल लोकोत्सवाचे वैशिष्ट्य ः रोल मॉडेल, प्रेरणादायी आणि दिग्गजांचीही राहणार उपस्थिती
कोल्हापूर, ता. १५ ः सात दिवसांचा महोत्सव, २८ राज्यांतील भाविकांसह पन्नास देशांतील परदेशी पाहुण्यांची हजेरी, एक लाख स्क्वेअर फुटाचा मंडप, चार हजार वैदूंचे संमेलन ही २० फेब्रुवारीपासून कणेरीच्या सिद्धगिरी मठावर होणाऱ्या पंचमहाभूत सुमंगल लोकमहोत्सवाची वैशिष्ट्ये राहाणार आहेत.
पर्यावरण, शेती, अध्यात्म, सामाजिक, आर्थिक, राजकीय, उद्योग, शिक्षण, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक यासह सर्व क्षेत्रांतील रोल मॉडेल, प्रेरणादायी आणि दिग्गज व्यक्तींची सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात उपस्थिती असणार आहे. अनेकांच्या संघर्षमय आणि यशस्वी वाटचालीची कहाणी या लोकोत्सवात उलघडणार आहे. यामुळे नव्या वाटचालीसाठी आशेची नवी किरणे यातून मिळणार आहेत.
महोत्सवात पर्यावरण जागृती, व्यापार उद्योगाची वृद्धी, सेंद्रिय शेतीचा प्रसार, यासह नव्या पिढीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी रोज दोन सत्रांत अनेक मान्यवरांचा मुक्त संवाद होणार आहे. सेंद्रिय शेती कशी करावी, नवनवे स्टार्टअप कोणते आहेत, व्यवसाय सुरू करताना काय काळजी घ्यावी, यासह अनेक गोष्टींचे मार्गदर्शन होणार आहे.
या लोकोत्सवात हजारावर साधूसंतांचा सहवास लाभणार आहे. यातून विज्ञान आणि अध्यात्माची सांगड कशी घातली जाईल, याची माहिती मिळेल. पाचशे कुलगुरू शिक्षण क्षेत्रातील नव्या संशोधनावर प्रकाश टाकतील. दहा हजारांवर उद्योजक आपल्या यशस्वी वाटचालीचा लेखाजोखा मांडतील. चार हजारांवर वैदू औषधी वनस्पतींची माहिती देतील. जगभरातून येणारे परदेशी पाहुणेही प्रगतीचा मार्ग दाखविणार आहेत.
.........
यांची प्रमुख उपस्थिती
पाणीतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा, बाबा सिचेवाल, संजयसिंह सज्जन, ५८ गावांतील दुष्काळ हटविणारे लक्ष्मण सिंह, पर्यटनतज्ज्ञ कानसिंह निर्वाण, सेंद्रिय शेती करणारे किसनसिंह जाखड, सुप्रसिद्ध उद्योजक श्रीधर व्यंभू, हणमंतराव गायकवाड, पोपटराव पवार, विजय संकेश्वर, मिलेटमॅन डॉ. कादर, स्वामी, त्याग वल्लभ दासी, माधवप्रिय दासजी, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, मंत्री अनुराग ठाकूर, संशोधक गुरुराज करजगी, खासदार अमोल कोल्हे, तेजस्वी सूर्या, अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांची उपस्थिती राहाणार आहे.
.........
ही आहेत वैशिष्ट्ये
३०० जिल्ह्यांतील संस्था, प्रतिनिधींचा सहभाग
५०० कुलगुरूंची राहणार उपस्थिती
६५० एकरांत लोकोत्सव
१००० देशभरातील साधूसंतांचा लाभणार सहवास
४००० वैदूंचे होणार संमेलन
१०,००० व्यवसायिकांचे संमेलन आणि अनुभव कथन
तीस लाख लोकांचा सहभाग अपेक्षित
एक लाख स्क्वेअर फूट जागेत मुख्य मंडप
........
‘आध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक, उद्योग, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक, शेती, अर्थकारण यासह सर्व क्षेत्रांतील रोल मॉडेल, मान्यवर आणि दिग्गज व्यक्ती या लोकोत्सवात सहभागी होणार आहेत. यामुळे हा लोकोत्सव नव्या पिढीला निश्चितपणे आशेची नवी किरणे देईल.
संतोष पाटील, विश्वस्त, श्रीक्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठ