
शहीद मदत
बसर्गेच्या शहीद जवानाच्या
वारसांना एक कोटीची मदत
शासन आदेश जारी ः पत्नीला ६० लाख, तर आई-वडिलांना प्रत्येकी २० लाख
कोल्हापूर, ता. १५ ः लेह (लडाख) येथे अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेले बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथील जवान प्रशांत शिवाजी जाधव यांच्या वारसांना एक कोटी रुपयांची मदत जाहीर झाली आहे. यासंदर्भातील शासन आदेश आज निघाले. या मदतीपैकी ६० लाख रुपयांची रक्कम प्रशांत यांच्या पत्नी पद्मा यांना, तर आई-वडिलांना प्रत्येकी २० लाख रुपये देण्यात येणार आहेत.
देशरक्षणार्थ धारातीर्थी पडलेल्या महाराष्ट्रातील जवानांच्या वारसांना एक कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने २ ऑगष्ट २०१९ रोजी घेतला होता. यात सीमा सुरक्षा दलासह अन्य दलातील सैनिकांचा समावेश होता. शहीद प्रशांत जाधव हे देशांतर्गत सुरक्षेसंबंधी नेमलेल्या मेघदूत योजनेत लेह येथे कार्यरत होते. २७ मे २०२२ रोजी कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले. याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांच्या वारसांना एक कोटीची मदत जाहीर केली.
.........