
फुटबॉल
83090
-
‘खंडोबा’चा जुना बुधवारवर विजय
रणवीर जाधवचे दोन गोल; ‘संध्यामठ’ची रंकाळा तालीम मंडळावर मात
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ : शाहू छत्रपती केएसए लीग वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम संघाने जुना बुधवार तालीम संघाचा ५ गोलनी पराभव केला, तर संध्यामठ तालीम मंडळाने रंकाळा तालीम मंडळावर दोन गोलनी विजय मिळवला.
येथील शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर हे सामने खेळले जात आहेत. पहिला सामना संध्यामठ तालीम विरुद्ध रंकाळा तालीम यांच्यात झाला. हा सामना पूर्वार्धामध्ये गोलशून्य बरोबरीत होता. उत्तरार्धामध्ये संध्यामठच्या यश जांभळे याने ५२ व्या मिनिटाला पहिल्या गोलची नोंद केली. या गोलची परतफेड करण्यासाठी रंकाळा तालीम मंडळाचे प्रयत्न अपुरे ठरले. त्यानंतर ६२ व्या मिनिटाला संध्यामठच्या स्वराज्य सरनाईक याने दुसरा गोल नोंदविला आणि विजयाची मोहर पक्की केली. संध्यामठचे किरण कावणेकर, अजिंक्य शिंदे, लकी जहारी यांनी समन्वय साधत संघाला आघाडी मिळवून दिली. रंकाळा तालीम मंडळाचे देवराज मंडलिक, प्रतीक बेडेकर आणि नीरज भोसले यांनी गोलच्या परतफेडीसाठी प्रयत्न करताना चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले.
दुसरा सामना खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार यांच्यात झाला. साखळी फेरीत वर्चस्व राखण्यासाठी खंडोबा तालीम मंडळाला हा सामना जिंकणे गरजेचे होते. त्यामुळे हा संघ ईर्षेनेच मैदानात उतरला. सामन्याची सुरुवात होताच पाचव्याच मिनिटाला खंडोबाचा कुणाल दळवी याने पहिला मैदानी गोल केला. त्यानंतर १७ व्या मिनिटाला रणवीर जाधव याने दुसऱ्या गोलची नोंद केली. या सामन्यामध्ये जुना बुधवारकडून अत्यंत संथ खेळ झाला होता. ३३ व्या मिनिटाला संकेत मेढे याने तिसरा गोल नोंदवला. पूर्वार्धात सामना ३-० गोल असा होता.
उत्तरार्धामध्ये संयुक्त जुना बुधवारकडून गोलची परतफेड करण्यासाठी केलेले प्रयत्न अपुरे ठरले. संघाच्या रविराज भोसले, आकाश मोरे, मनीष जगताप, दिशमोन अवेथी यांनी गोलसाठी केलेले प्रयत्न समन्वयाअभावी अपुरे ठरले. ६५ व्या मिनिटाला खंडोबाच्या अजिज मोमिन याने संघाचा चौथा गोल केला. उत्तरार्धात मिळालेल्या जादा वेळेत खंडोबाच्या रणवीर जाधव याने बचाव फळीच्या खेळाडूंना चकवा देत गोलची नोंद केली आणि हा सामना खंडोबा तालीम संघाने तब्बल पाच विरुद्ध शून्य गोलनी जिंकला. वरिष्ठ गटातील रंकाळा तालीम मंडळ आणि ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ हे दोन संघ ‘ब’ गटात जाणार आहेत.
चौकट
आजचे सामने
सम्राटनगर स्पोर्टस् विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक तालीम मंडळ : दुपारी दोन वाजता.
बी. जी. एम. स्पोर्टस् विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब : चार वाजता.