रिपोर्ताज - चेतना विकास मंदिर मधील एक दिवस

रिपोर्ताज - चेतना विकास मंदिर मधील एक दिवस

रिपोर्ताज...
ओंकार धर्माधिकारी

83007

मन जागवणारी ‘चेतना’
विशेष मुलांना मिळते आत्मविश्वासाने वावरण्याचे बळ

इंट्रो -
ही मुले विशेष आहेत, अन्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत त्यांचा बुद्ध्यांक कमी असतो. पण चेतना अपंगमती विकास संस्थेच्या शाळेत त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले जाते. समाजात आत्मविश्वासाने वावरण्याचे बळ मिळते. इथले शिक्षक, संस्थाचालक आणि कर्मचारी यांच्या कामातून संस्थेच्या शाळेत माणुसकीचे मूर्त स्वरूप पाहायला मिळते.
-------------------------------------------------------------

शेंडा पार्क येथील चेतना विकास संस्थेच्या आवारात सकाळी १०.३० च्या सुमारास पालकांची वाहने येऊन थांबतात. काहीशी गोंधळलेली, अडखळत चालणारी मुले, मुली ‘चेतना’च्या आवारात जमतात. मग रांगेने आपापल्या वर्गात जाऊन बसतात. मग त्यांचा सुरू होतो तास. कोणी फाईल बनण्याचा कामात व्यस्त होते, तर कोणी हस्तकलेच्या वस्तू बनवण्यात गुंग होऊन जाते. काही विद्यार्थ्यांना येथील शिक्षक कसे वागायचे, कसे बोलायचे याचे धडे देत असतात. इथल्या तंत्रशाळेत विविध वस्तूंची उत्पादने बनवण्याचे ते प्रशिक्षण घेतात. दुपारी २ वाजता एकत्र जेवतात. संध्याकाळी ५ वाजता पुन्हा पालकांबरोबर आपापल्या घरी जातात. १९८६ पासून चेतना संस्थेच्या शाळेत वर्षानुवर्षे याच पद्धतीने बौद्धिक असक्षम मुलांचे शिक्षण सुरू आहे. त्यातून अनेक बैद्धिक असक्षम मुले, मुली सक्षमपणे समाजात वावरतात, अर्थार्जन करत आहेत. या संस्थेने याच विशेष मुलांमधून राष्ट्रीय पातळीवरचे कलाकार आणि खेळाडूही घडवले आहेत. चेतना अपंगमती विकास संस्थेने या विशेष मुलांना शिक्षण दिले. समाजाने या मुलांना स्वीकारावे इतपत सक्षम बनवले.

बैद्धिक अक्षमता...
सर्वसाधारणपणे आपला बुद्ध्यांक हा ७० पेक्षा अधिक असतो. अत्यंत हुशार व्यक्तीचा बुद्ध्यांक १०० च्या पुढे असतो. मात्र काही मुले, मुली यांचा बुद्ध्यांक ५० च्या पुढे ते ७० च्या आत असतो. त्यांना बौद्धिक अक्षम म्हटले जाते. चेतना संस्थेमध्ये अशा मुलांसाठी शिक्षण दिले जाते. अशा विशेष मुलांचे त्यांनी तीन विभागात वर्गीकरण केले. पहिला विभाग एज्युकेबल मुलांचा, यांचा बुद्ध्यांक ५० च्या पुढे पण ७० च्या आत असतो. दुसरा विभाग ट्रेनेबल विद्यार्थ्यांचा, या विभागातील विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक हा २० ते ५० या प्रमाणात असतो. २० पेक्षाही कमी बुद्ध्यांक असणाऱ्या विद्यार्थ्यांचा केअर ग्रुप केला आहे. प्रत्येक विभागातील विद्यार्थ्यांच्या आकलनाप्रमाणे त्यांना वेगवेगळ्या गोष्टींचे प्रशिक्षण येथे दिले जाते.

असे होते प्रशिक्षण
येथील विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्या एकूण शिक्षणात त्यांना सुमारे शंभर प्रकारची कौशल्ये शिकवली जातात. व्यक्तिगत अभ्यासक्रमात दैनंदीन व्यक्तिगत कामे कशी करायची? हे शिकवले जाते. यामध्ये शर्ट कसा परिधान करायचा, स्वच्छता कशी ठेवायची? हे शिकवले जाते. समाजातील व्यावहारिक कौशल्यामध्ये शिकवली जातात. शैक्षणिक कौशल्यात पत्र लेखन, अर्ज लेखन, दैनंदिन जीवनातील आर्थिक व्यवहार हे शिकवले जातात. व्यावसायिक प्रशिक्षणात या मुलांना विविध वस्तू बनवणे, यंत्रे हातळणे, संगणक याचे प्रशिक्षण दिले जाते. यातून या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. याचा फायदा त्यांना समाजात वावरताना होतो.

पुनर्वसनाचा अंतिम टप्पा... व्यावसायिक प्रशिक्षण
चेतना विकास संस्थेत बौद्धिक असक्षम मुलांच्या पुनर्वसनाचा अंतिम टप्पा म्हणून मुला, मुलींसाठी व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये फाईल रजिस्टर बनवणे, स्क्रीन प्रिंटिंग, सुतारकाम, कागदी लगद्यापासून मूर्ती बनवणे, गृहशास्त्र प्रशिक्षण संस्था, शैक्षणिक साधनांचे संच बनवणे अशा प्रकारचे विविध व्यवसाय मुला मुलींना शिकवण्यात येतात. त्यातून ही मुले स्वावलंबी होतात. लाकडी घाण्यातून तेल निर्मिती आणि बेकरी विभागही येथे आहेत.

कौशल्यांचा विकास आणि क्षमतांची जाणीव
बौद्धिक अक्षम मुलांचे भविष्यात कसे होणार? त्यांना कोण सांभाळणार याची काळजी पालकांना असते. मात्र चेतना विकास संस्थेत आल्यावर या विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास केला जातो. त्यांचा आत्मविश्वासाने अर्थार्जन करण्याचे मार्ग दाखवले जातात. यामुळे काही प्रमाणात ही मुले स्वावलंबी होतात. आज विविध दुकाने, संस्थांमध्ये हे विद्यार्थी काम करतात. काहीजण घरगुती व्यवसाय करतात. हे संस्थेच्या कार्याचे यश आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------
कोट
बौद्धिक अक्षमता असणाऱ्यांना समाज स्वीकारत नव्हता. त्यामुळे त्यांच्या वाट्याला उपेक्षा यायची. संस्थेत येणाऱ्या मुला, मुलींना आम्ही सर्व प्रकारची कौशल्ये शिकवतो. त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देतो. त्यांच्यातील काही गुणांचा विकास करतो. यामुळे त्यांचे कुटुंबीय आणि समाज त्यांना स्वीकारतो. या मुलांच्या वाट्याला येणारा संघर्ष कमी होतो. याचे समाधान आहे.
- पवन खेबुडकर, कार्यकारी अध्यक्ष, चेतना अपंगमती विकास संस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com