
चंदगडच्या कलाकारांनी साकारला लघु चित्रपट
चंदगडच्या कलाकारांनी साकारला लघुचित्रपट
दौलत; आम्ही चंदगडी यू ट्यूबवर २२ रोजी होणार प्रदर्शित
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १६ ः तालुक्यातील कलाकारांच्या कलाकृतीतून साकारलेल्या ‘दौलत’ या लघु चित्रपटाचे प्रदर्शन २२ तारखेला आम्ही चंदगडी फिल्म या यू ट्यूब चॅनेलवरून होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक गोपाळ कानूरकर यांनी ही माहिती दिली.
तालुक्याच्या औद्योगिकरणाचा कणा असलेला दौलत साखर कारखाना मधल्या काळात बंद पडला. त्यामुळे अनेक कामगार बेरोजगार झाले. कारखान्यावर आधारित इतर उद्योग-व्यवसायांची चाके बंद झाली. त्याचे दूरगामी परिणाम त्या-त्या कुटुंबावरही झाले. दौलत या चित्रपटातून त्याचेच प्रतिबिंब टिपले आहे. ३५ मिनिटाच्या चित्रपटाचे चित्रीकरण दौलत कारखाना, हलकर्णी, बिजूर, हिंडगाव येथे झाले आहे. यामध्ये भरत भोसले, परशुराम पारधी, आत्माराम पाटील, नागराज पाच्चे, तुषार पाटील, वैशाली पाटील, मानसी मांगोरे, आरती मोरे यांनी कलाकार म्हणून काम केले आहे. रोहित पाटील यांच्या आवाजात दोन गाणी आहेत. राहुल कडते, सागर गावडे, विठोबा गावडे, सदाशिव चौगुले यांचे सहकार्य लाभले. हा चित्रपट प्रत्येकाला भावेल, असा विश्वास निर्माते युवराज शिंदे, संजय मुळीकर यांनी व्यक्त केला. प्रेक्षकांनी या चित्रपटाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले आहे.