
कर्मचाऱ्यांच्या संपाने शिवाजी विद्यापीठ प्रशासनाचे काम ठप्प
83208
कर्मचाऱ्यांच्या संपाने
प्रशासनाचे काम ठप्प
कृती समितीचा आंदोलनाबाबत आज निर्णय
कोल्हापूर, ता. १६ ः विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवाजी विद्यापीठ सेवक संघाच्या पदाधिकारी, सभासद, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज एकदिवसीय लाक्षणिक संप केला. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाचे काम ठप्प झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या चर्चेचे लिखित इतिवृत्त शुक्रवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती आंदोलन स्थगितीबाबतचा पुढील निर्णय घेणार आहे.
या कृती समितीच्या नेतृत्वाखाली १४ दिवसांपासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे परीक्षा कामकाजावर बहिष्कार आंदोलन सुरू आहे. त्यातील पुढील टप्पा म्हणून या कर्मचाऱ्यांनी आज एकदिवसीय लाक्षणिक संप केला. मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारात सकाळी दहा वाजता त्यांनी एकत्रित येऊन निदर्शने केली. कृती समितीचे मुख्य संघटक मिलिंद भोसले यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या चर्चेची माहिती दिली. या चर्चेच्या बैठकीतील इतिवृत्त जोपर्यंत लेखी स्वरूपात मिळत नाही तोपर्यंत आंदोलन पुढे सुरू राहील, असे त्यांनी सांगितले. विद्यापीठ सेवक संघाचे उपाध्यक्ष संजय पोवार, सरचिटणीस राम तुपे, राजेंद्र खामकर, विकास मोहिते, निशिकांत पलंगे, अनिल पाटील, अजय आयरेकर, सदानंद माने, वंदना गुरव, शिवांजली पाटील, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अतिरिक्त महासचिव आनंद खामकर, दीपक शिंदे, दिनेश उथळे, सरदार सोनंदकर, प्रकाश श्रावस्ती उपस्थित होते.