
हद्दवाढीबाबत बैठक
हद्दवाढीबाबत समर्थक, विरोधकांसोबत
आज पालकमंत्र्यांची संयुक्त बैठक
कोल्हापूर, ता. १६ : गेल्या डिसेंबरपासून सुरू असलेल्या पाठपुराव्यानंतर उद्या (ता. १७) पालकमंत्री दीपक केसरकर यांनी हद्दवाढीबाबत बैठक बोलवली आहे. त्यासाठी कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती व समन्वय समिती, विरोधी कृती समितीबरोबरच आमदार, क्रिडाई, माजी महापौर आदी विविध घटकांना निमंत्रित केले आहे.
रविवारी (ता. १९) मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिल्यानंतर ही बैठक घेतली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील दुपारी साडेचार वाजता बैठकीचे नियोजन केले आहे. त्यात विरोधकांनाही बोलवले असून आमदार, माजी आमदार, माजी महापौर, क्रिडाई यांनाही निमंत्रित केले आहे. कोल्हापूर हद्दवाढ कृती समितीच्या वतीने हद्दवाढीबाबत सातत्याने पाठपुरावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हद्दवाढीचा प्रस्ताव मागवून घेतला. दोनदा चर्चा झाली पण निर्णय झालेला नाही. त्याबाबत पालकमंत्री दीपक केसरकर यांचीही भेट घेतली. त्यांनी अभ्यास करून महिन्यात बैठक घेतो असे सांगितले होते. मात्र, आजतागायत बैठक झाली नसल्याने समितीने आंदोलनाचा इशारा दिला. त्यामुळे पालकमंत्र्यांनी शुक्रवारी बैठक घेणार असल्याचे सांगितले असून कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे ॲड. बाबा इंदुलकर यांनी सांगितले.