वीज मीटर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीज मीटर
वीज मीटर

वीज मीटर

sakal_logo
By

वीज मीटर तुटवड्याने
ग्राहकांना भुर्दंड
दोन ते तीन महिन्यांचा विलंब; सरासरीनुसार बिल वसुली
शिवाजी यादव : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : घराचे वीज मीटर नादुरुस्त किंवा नवीन मीटर घ्यायचे झाल्यास महावितरणकडून वीज मीटर देण्यास विलंब होत आहे. परिणामी नादुरुस्त मीटर बदलण्यास दोन ते तीन महिन्यांचा कालावधी जातो. याकाळात महावितरणकडून सरासरीनुसार वीज बिल वसूल होते, तर नवीन जोडणीसाठी मीटर शिल्लक नसल्यास ग्राहकाला खासगी बाजारपेठेतून वीज मीटर घ्यावे लागते. त्यामुळे राज्यातील १४ लाख वीज ग्राहकांला भुर्दंड सोसावा लागत आहे.
नवीन बांधकाम झाल्यानंतर वीज जोडणी घेण्यासाठी वीज ग्राहकांना सर्व कागदपत्रे अनामत रक्कम दिल्यानंतर महावितरण चार ते पाच दिवसांत वीजपुरवठा सुरू करणे अपेक्षित आहे, मात्र बहुतेक वेळा वीज मीटर शिल्लक नाही, असे उत्तर येत आहे. त्यानंतर पुढे कमीत कमी पंधरा दिवसांत एक महिनाभर वाट पाहायला लावली जाते. एखाद्याने फारच घाई केल्यास तुम्हीच खासगी बाजारातून मीटर आणा, असे सांगण्यात येते. असा अनुभव ग्राहकांना येत आहे.
खासगी बाजारपेठेत वॅटनुसार कमीत कमी दोन ते तीन हजार रुपयांपर्यंत किंमत देऊन ग्राहक मीटर आणतात. तेच मीटर महावितरणच्या कार्यालयात ४८ ते ६० तास तपासणीसाठी लावले जाते. मीटर तंत्रशुद्ध असल्याचा दाखला दिला जातो. तसेच ग्राहकाकडून तपासणी शुल्कही घेतले जाते. यानंतर ग्राहकाचे मीटर बसवले जाते. त्यासाठी ग्राहकांना किमान पंधरा ते वीस दिवस, तर कधी एक महिनाभर प्रतीक्षा करावी लागते.
दरम्यान, महावितरण कंपनीकडे मीटर उपलब्ध झाली आहेत. कोल्हापूर व सांगलीसाठी प्रत्येकी दोन हजार मीटर पाठवली आहेत. आणखी काही मीटर या महिन्याअखेरीस पाठवण्यात येतील. त्यामुळे महावितरणकडे मीटरचा तुटवडा नाही, अशी माहिती महावितरणच्या जनसंपर्क विभागामार्फत देण्यात आली.
------------------
चौकट
खासगी बाजारपेठेला महसूल
महावितरणकडून दर महिन्याला जिल्हाभरात कमीत कमी १२०० ते १८०० वीज मीटरची मागणी असते. यापैकी २५ ते ३२ टक्के ग्राहकांना खासगी बाजारपेठेतून वीज मीटर घ्यावे लागते. म्हणजे महिन्याकाठी किमान १५ ते २० लाखांचा महसूल खासगी बाजार पेठेकडे जातो. महावितरणकडे वर्षातून किमान तीन ते चार वेळा परिमंडलात वीज मीटरची गरज भागेल एवढा साठा येतो, मात्र तो संपला की नवीन साठा येईपर्यंत ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागते, असा अनुभवही ग्राहकांकडून सांगण्यात आला.
-----------
कोट
वीज मीटर उपलब्ध करणे ते बसवण्याची महावितरणची कायदेशीर जबाबदारी आहे. असे असताना मीटर देण्यात चालढकल करणे हेच बेकायदेशीर आहे. नादुरुस्त मीटर बदलणे किंवा तपासून देणे तेही एक दोन दिवसांत होणे बंधनकारक आहे, मात्र तेही टाळले जाते. राज्यातील दोन कोटी ८० लाख ग्राहकांपैकी १४ लाख ग्राहकांची मीटर नादुरुस्त असतील, तर महावितरण ग्राहकांचे नुकसान करते, असे नुकसान हेतुपुरस्सर केले जाते का, असा संशय बळावत आहे.
- प्रताप होगाडे, राज्याध्यक्ष